प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

सरकारने 50 व्यक्तींनाच समारंभ घेण्यास परवानगी दिल्याने, कॅटर्स, डेकोरेशन, मंडप, इलेक्ट्रिक या व्यवसायावर उपासमारीची वेळ आली आहे. किमान पाचशे लोकांच्या कार्यक्रमाची परवानगी द्यावी. अन्यथा आम्ही आत्मनिर्भर होऊन व्यवसाय सुरू करू, असा सज्जड इशारा या संघटनेने आता दिला आहे. राज्यातील सर्वच व्यवसायिक 2 नोव्हेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे.

वर्धा (Wardha): सरकारने 50 व्यक्तींनाच समारंभ घेण्यास परवानगी दिल्याने, कॅटर्स, डेकोरेशन, मंडप, इलेक्ट्रिक या व्यवसायावर उपासमारीची वेळ आली आहे. किमान पाचशे लोकांच्या कार्यक्रमाची परवानगी द्यावी. अन्यथा आम्ही आत्मनिर्भर होऊन व्यवसाय सुरू करू, असा सज्जड इशारा या संघटनेने आता दिला आहे. राज्यातील सर्वच व्यवसायिक 2 नोव्हेंबरला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे.

लॉकडाऊनचा फटका समारंभांना बसतोय. तसाच तो त्यावर अवलंबून असणा-या व्यवसायांनाही बसतो आहे. समारंभ पार पाडण्यासाठी महत्वाचे घटक असलेल्या केटरिंग आणि डेकोरेशनचे व मंगल कार्यालय, देखील लॉकडाऊनमुळे अडचणीत आले आहेत. तर या व्यवसायांवर अवलंबून असणा-या अनेक कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. जिल्ह्यात मंगल कार्यालय, मंडप डेकोरेशन इलेक्ट्रिक सिस्टिम, केटरिंग व्यवसाय, फेटा बांधणारे असे किमान 500 व्यवसायिक आहेत. परंतु, सरकारने अद्याप समारंभाला परवानगी न दिल्याने या सर्व व्यावसायिकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन झाल्याने या व्यावसायिकांना आजपर्यंत कुठलाही व्यवसाय करता आला नाही. त्यामुळे ऐन सिजनमध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनचा मोठा फटका केटरिंग आणि डेकोरेटर्स या व्यवसायांना बसला. मागणीच नसल्याने व्यवसायिकांचे साहित्य धूळ खात पडून आहे.

व्यवसायात नव्याने आलेल्या व्यावसायिकांवर बँकेचे कर्ज डोक्यावर चढले आहे. काही व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायात नवीन सामग्री खरेदी करून पुढील वर्षात आपण चांगला व्यवसाय करू ही मनीषा बाळगली होती. सिजनमध्ये कामगार उपयोगी येतील या अपेक्षेने आठ महिने कामगारांना सांभाळले. मात्र, कोरोनामुळे सर्व नियोजन धुळीस मिळाल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. या आठ महिन्यात त्यांच्याकडे काम करत असलेल्या कामगारांना सतत आर्थिक मदत केली. परंतु, आता ती करणेसुद्धा शक्य नाही अशी सर्वांची परिस्थिती निर्माण झाली आहे.  सरकारने निर्णय घ्यावा, अनलॉक पाच नंतर सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट या सर्वांना परवानगी दिली. परंतु, समारंभाला फक्त पन्नास लोकांची परवानगी सरकारने दिली आहे. ती 500 लोकांसाठी करावी अशी मागणीही या क्षेत्रातून होत आहे. व्यवसायावर अनेक परिवारांचा उदरनिर्वाह देखील अवलंबून आहे. सणासुदीचे दिवस जवळ आले आहे. परंतु या कामगारांना द्यायला आता या व्यावसायिकांकडे कुठलीही गंगाजळी शिल्लक राहिली नाही. सरकारने नियमावली बांधून या व्यावसायिकांना आता परवानगी देण्याची जास्त गरज झालेली आहे.

आता लढो वा मरोची भूमिका घेऊ
राज्यात सर्व व्यवसाय 100% सुरू झाले आहे. या व्यवसायात दररोज नागरिकांची गर्दी असते. आमचे व्यवसाय हे हंगामी स्वरूपाचे आहेत. महिन्यातून किमान आठ दिवस फक्त व्यवसाय सुरु असतो. या वर्षाचा व्यवसाय तर गेला. परंतु, पुढील वर्षी व्यवसाय होईल की नाही यामुळे सर्व चिंताग्रस्त आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 2 नोव्हेंबरला राज्यात आम्ही लाक्षणिक उपोषण करणार आहोत.
— संजय ठाकरे, सहसचिव, वर्धा मंडप बिछायत, इलेक्ट्रिक डेकोरेशन, साऊंड सिस्टिम, वर्धा.