बर्ड फ्लूच्या प्रसाराला वेग! कोंबडी, कावळे आणि इतर पक्ष्यांनंतर आता मोरांचा देखील होतोय मृत्यू 

कोंबडी, कावळे आणि इतर पक्ष्यांनंतर आता मोर देखील मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव-दातार येथील शिवारात काल बुधवारी दुपारी मोर मृतावस्थेत सापडल्याने येथील परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

वर्धा : देशातील आठ राज्यांत बर्ड फ्लूचा प्रसार वेगाने वाढत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात सुद्धा बर्ड फ्लूने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. कोंबडी, कावळे आणि इतर पक्ष्यांनंतर आता मोर देखील मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव-दातार येथील शिवारात काल बुधवारी दुपारी मोर मृतावस्थेत सापडल्याने येथील परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

या घटनेची माहिती मिळताच, वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी एकूण आठ मोर मृतावस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी मृत मोरांचे नमुने पुण्याला पाठविले आहेत. हे नमुने आल्यानंतरच या घटनेची सत्यता समोर येणार आहे. परंतु यामध्ये एक नर तर सात मादी असल्याचं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या बर्ड फ्ल्यूची साथ सुरू आहे. अशातच आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

राज्यात दोन हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला असून कावळ्यांच्या मृतांची संख्या देखील वाढली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकार सर्व आवश्यक खबरदारी घेत आहे.