आष्टी शहरात दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

आष्टी शहरात गेल्या आठवडाभरापासून शहराच्या काही भागात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. या दूषित पाणीपुरवठयाकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांनी तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एक वर्षापासून नियमित मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायतीचा भोंगळ कारभार सुरू आहे. यामुळे नियमित मुख्याधिकारी देण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहे.

  • नगरपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त
  • वर्षभरापासून नगरपंचायतला नाही नियमित मुख्याधिकारी

आष्टी शहीद (Ashti Shaheed).  आष्टी शहरात गेल्या आठवडाभरापासून शहराच्या काही भागात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. या दूषित पाणीपुरवठयाकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांनी तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एक वर्षापासून नियमित मुख्याधिकारी नसल्याने नगरपंचायतीचा भोंगळ कारभार सुरू आहे. यामुळे नियमित मुख्याधिकारी देण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहे.

आष्टी नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या शहराची लोकसंख्या वीस हजार आहे. यामुळे नागरिकांना सुविधा मिळणे गरजेचे होते. महिनाभरापासून नगरपंचायतीचे कामकाज ढेपाळले आहे. नगरपंचायतच्या कर्मचा-यांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही. गेल्या वर्षभरापासून नगरपंचायतला नियमित मुख्याधिकारी नसल्याने विकास कामांत अडथळे निर्माण होत आहे. शहरात घरकुलाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असताना घरकुल धारकांना घराचे काम पूर्ण होऊन सुद्धा अनुदान मिळाले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर गेल्या पंधरा दिवसापासून घंटागाडी व सफाई कामगार बंद असल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.आष्टी शहराच्या मुख्य रस्त्यावरील मस्जित चौकापासून ते गोपाल बिजवे यांच्या घरापर्यंत येणा-या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन मधून नागरिकांच्या घरांमध्ये दुर्गंधीयुक्त, गढूळ पाणी पुरवठा होत आहे. याकडे संबंधित कर्मचा-यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. आष्टी नगरपंचायत अंतर्गत शहरातील नागरिकांना वसुलीचे दुप्पट बिल पाठवल्या असल्याने येथील नागरिक संभ्रमात पडले आहे. करवाढी संदर्भात आष्टी नगरपंचायत मध्ये कोणत्याही प्रकारची सभा किंवा मासिक बैठक न घेता घर टॅक्स पावती दुपटीने देण्यात आली. वर्ष 19- 20 मध्ये घरकर सहाशे रुपये असा होता. वर्ष 20 – 21 मध्ये बाराशे रुपये कर देण्यात आला. यासोबत वृक्षकर, अग्निशमन कर असे विविध कर लावून नागरिकांना कर वसुलीचे बिले देण्यात आली आहे.

या निष्क्रिय नगरपंचायत च्या कामकाजाचा येथील भाजपा नगरसेवक अजय लेकुरवाडे यांनी तीव्र निषेध केला आहे. नगरपंचायतीच्या ढेपाळलेल्या कामकाजामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे. नगरपंचायतीवर नागरिकांनी निवडणुकीत काँग्रेसला एकहाती सत्ता दिली. नगरपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता व आर्वी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा आमदार असल्याने विकास कामाला गती येईल, असे नागरिकांना वाटत होते. मात्र नागरिकांची निराशा झाली. त्यावेळी महाराष्ट्रात भाजपाचे सरकार होते आष्टी नगरपंचायतमध्ये भाजपाची सत्ता नसतानाही शहराच्या विकास कामाकरिता माजी वित्त व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच कोटी रुपये दिले.

आज मात्र माजी आमदार यांचे राज्यात सरकार असताना सुद्धा नगरपंचायत विकास कामापासून कोसो दूर आहे. असे नागरिकांचे म्हणणे आहे. आष्टी नगरपंचायतची मुदत संपली असून अवघ्या दोन महिन्यात निवडणूक होणार आहे. यामध्ये आष्टी नगरवाशी कोणाला बहुमत देणार, हे मात्र वेळच सांगणार आहे. नगरपंचायतचे वार्ड निहाय आरक्षण जाहीर झाले आहे. येत्या निवडणुकीत पक्षांतर्गत कुणाला उभे करायचे? यासाठी उमेदवारांचा शोध घेणे सुरू आहे. शहरात निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे. त्यामुळे येणा-या निवडणुकीत याचा सारासार विचार करून नागरिक कोणाला कौल देईल. हे येणारा काळच ठरविणार आहे.