सततच्या पावसामुळे ५४ गावातील पीक धोक्यात; शेतात पाणी आणि चिखलाचा खच

उभ्या पिकाला फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. वर्धा जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी ७३६५.७० मिमी पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी आतापर्यंत ६९७१.९५ मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.

  वर्धा (Wardha) : सप्टेंबर महिन्यात (monsoon rains in September) उसंत घेत सुरू असलेल्या पावसासह नदी व नाल्याच्या पुरामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ५४ गावांमधील ७०१.५० हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर, मिरची, केळी, आंबा, ऊस, लिंबू, अद्रक पिकाचे नुकसान केले आहे. उभ्या पिकाला फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. वर्धा जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत सरासरी ७३६५.७० मिमी पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी आतापर्यंत ६९७१.९५ मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.

  ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिकांना जलसंकटाला तोंड द्यावे लागेल, अशी शक्यता वर्तविली जात होती; परंतु ऑगस्ट महिन्यात अखेरच्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाने सप्टेंबर महिन्यात आपला जोर कायम ठेवल्याने जलाशय फुल्ल झाल्याने जलसंकट टळले असले तरी सप्टेंबर महिन्यात उसंत घेत सुरू असलेल्या पावसासह नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे ७०१.५० हेक्टरवरील उभ्या पिकांना फटका बसला आहे.

  २४ तासांत ५७.२४ मिमी पावसाची नोंद
  — मागील २४ तासांत जिल्ह्यात ५७.२४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. वर्धा ५.५२ मिमी, सेलू ४.४० मिमी, देवळी ८.५५ मिमी, हिंगणघाट ४.५० मिमी, समुद्रपूर २.६८ मिमी, आर्वी ५.६६ मिमी, आष्टी १५.५३ मिमी तर कारंजा तालुक्यात १०.४० मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

  अतिवृष्टी अन् पुरामुळे कारंजा तालुक्यात सर्वाधिक नुकसान
  कारंजा तालुक्यातील ३१ गावांमधील ४७५.५० हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर व अद्रक पिकांचे अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाले आहे.

  – आर्वी तालुक्यातील दहा गावांमधील ६२.२ हेक्टरवरील कापूस, तूर, सोयाबीन , मिरची, ऊस, केळी पिकांचे नुकसान झाले आहे.

  – सेलू तालुक्यातील १३ गावांमधील ९८.८० हेक्टरवरील कापूस सोयाबीन, केळी व लिंबू पिकांना अतिवृष्टी व पुराचा फटका बसला आहे.

  सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यातील 54 गावांमधील 701.50 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे सामूहिक पंचनामे केले जात आहेत. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे.

  अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा