संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाज्यांना कवडीमोल दर मिळत आहे. अनेकांचा शेतमाल वाहतूक खर्च आणि मजुरांची मजुरीही निघत नाही. अशावेळी बळीराज्याला शासकीय यंत्रणेकडून दिलासा मिळणे अपेक्षित आहे. तालुक्यात 510 हेक्टर क्षेत्रात अंदाजे सातशेहून अधिक शेतकऱ्यांकडून भाजीपाला व विविध फळांचे उत्पादन घेतले जाते.

    सिंदी (रेल्वे) (Sindi Railway).  तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाज्यांना कवडीमोल दर मिळत आहे. अनेकांचा शेतमाल वाहतूक खर्च आणि मजुरांची मजुरीही निघत नाही. अशावेळी बळीराज्याला शासकीय यंत्रणेकडून दिलासा मिळणे अपेक्षित आहे. तालुक्यात 510 हेक्टर क्षेत्रात अंदाजे सातशेहून अधिक शेतकऱ्यांकडून भाजीपाला व विविध फळांचे उत्पादन घेतले जाते.

    यावर्षी लॉकडाऊन लागण्यापूर्वी लहान मोठ्या सर्वच ठिकाणचे आठवडी बाजार भरविण्यास बंदी घालण्यात आली होती. भाजीपाला विक्रीच्या वेळा काही तासांच्या करण्यात आल्या होत्या. लग्न समारंभासाठी मोजक्या लोकांच्या उपस्थितीची मर्यादा टाकण्यात आली. कोरोनाच्या भीतीने नागरिकांकडून भाजीपाला खरेदीचे प्रमाण घटले आहे. परिणामी पिकविलेला भाजीपाला अडते व ठोक खरेदीदारांना विकावा लागत आहे. शेतातून बाजारपर्यंत भाजीपाला, फळे विक्रीस आणतांना अनेकदा वाहनाचे भाडे, वाहतूक खर्च, मजुरांची मजुरीही निघत नाही. अशी भाजीपाला उत्पादक शेतक-यांची गंभीर स्थिती आहे.

    शेतक-यांचा गत वर्षांपासून निसर्गासोबत लढा सुरू आहे. शासनाकडून विविध घटकांना अनेक प्रकारे मदत, पॅकेज देऊन दिलासा दिला जात आहे. शेतकऱ्यांना साधी शेतमाल विक्रीची सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजी व आक्रोश आहे. वरिष्ठ अधिकारी, नगरपालिका, संबंधित कृषी, सहकार व बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी या विषयावर बैठक घेऊन सुयोग्य नियोजन करून बाजार समितीत भाजीपाला व फळविक्रीसाठी जागेची सुविधा पुढील काळाकरीता करून द्यावी, अशी शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे.

    सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबतच भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढविले आहे. यासाठी त्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून घेतल्या आहेत. पाण्याची मुबलकता असल्याने ही पिके घेण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. यासाठी ते प्रचंड मेहनत घेण्याची त्यांची तयारी आहे. यात त्यांना यशही मिळत आहे. मात्र, विक्रीसाठी नेण्यात आलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांच्या पदरी निराशा येत असल्याचे दिसून येते.

    भाजीपाला विक्रीत व्यापा-यांचे फावते
    तालुक्यातील शेतक-यांना भाजीपाला विक्रीसाठी नागपूर, हिंगणघाट अथवा वर्धा या ठिकाणी न्यावा लागतो. भाजीपाल्याचा लिलाव दररोज पहाटे सुरू होऊन सात वाजता संपतो. त्यापूर्वी शेतातील भाजीपाला काढून बाजारपेठेत पोहता करावा लागतो. परंतु या कालावधीत पहाटे मजुरच येत नसल्याने ते अशक्य होते. परिणामी शेतक-यांना आदल्या दिवशी भाजीपाला मजुरांच्या हाताने तोडून दिवसा माल बाजारपेठेत पोहता करावा लागतो. त्या मालाचा लिलाव दुस-या दिवशी सकाळी होतो. या कारणांमुळे शेतक-यांचा भाजीपाला विक्रीत कवडीमोल भाव मिळतो. यात व्यापा-यांचे फावते पण शेतक-यांचे मरण होते.