रस्ता रुंदीकरणासाठी केली झाडांची कत्तल; पर्यावरण प्रेमी उतरले रस्त्यावर

सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान सेवाग्राम मार्गावरील धन्वंतरी चौकातील दोन वृक्षांची कटाई केल्यामुळे या वृक्षतोडीचा तीव्र निषेध करीत नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी वृक्ष बचाओ समितीनेही बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणाविरूद्ध निषेधाचे पोस्टर्स झळकावीत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वर्धा (Wardha).  सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान सेवाग्राम मार्गावरील धन्वंतरी चौकातील दोन वृक्षांची कटाई केल्यामुळे या वृक्षतोडीचा तीव्र निषेध करीत नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी वृक्ष बचाओ समितीनेही बांधकाम विभागाच्या या हलगर्जीपणाविरूद्ध निषेधाचे पोस्टर्स झळकावीत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

धन्वंतरी चौकातील दोन मोठी झाडे रात्रीतून कापल्याचे आज सकाळी लक्षात येताच सेवाग्राम परिसरातील दक्ष नागरिकांनी रस्त्याच्या कामात असलेल्या जेसीपीला घेराव घातला. सोबतच वृक्ष बचाओ समितीच्या सदस्यांनाही या घटनेबाबत तातडीने कळविण्यात आले. दत्तपूर ते सेवाग्राम या रस्त्यावरील कोणतेही झाड बांधकाम विभाग व नागरिक समितीच्या परस्पर सहमतीशिवाय तोडण्यात येणार नाही, असे यापूर्वीच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले असल्यामुळे याची दखल घेत समितीच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या विभागीय अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे तसेच सहाय्यक कार्यकारी अभियंता माथुरकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

सदर वृक्षतोडीला बांधकाम विभागाने परवानगी दिली नसून अज्ञात व्यक्तीने जेसीपी चालकावर दबाव आणून व त्याला मारहाण करून ही झाडे तोडली असल्याचे सहाय्यक अभियंता माथुरकर यांनी सांगितले. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागद्वारे अज्ञात व्यक्तीविरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापुढे सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामात एकही झाड तोडण्यात आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वृक्ष बचाओ समिती तसेच स्थानिक नागरिकांनी दिला आहे.