गृहमंत्र्यांना दिले निवेदन
गृहमंत्र्यांना दिले निवेदन

  • समता सैनिक दलाची मागणी
  • --- समता सैनिक दल वर्धाच्यावतीने गृहमंत्र्यांकडे मागणी 

वर्धा (Wardha).    हिंगणघाट पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून बडतर्फ ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विस्तार अधिकारी एस. के. हेडाऊ यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा. मागासवर्गीय कर्मचा-याचा छळ केल्याप्रकरणी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समता सैनिक दल वर्धाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ग्रुहमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणा-या शेगाव कुंड ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत बुद्धघोष म्हस्के यांनी बुधवार,16 सप्टेंबर रोजी घरी गळफास लावून आत्महत्या केली. मृतक बुद्धघोष म्हस्के यांनी मृत्युपूर्वी आत्महत्येस प्रवृत्त करणा-या व्यक्तीबाबत स्व:लिखित चिठ्ठी लिहून ठेवली होती. चिठ्ठीमध्ये त्यांनी विस्तार अधिकारी एस. के. हेडाऊ मानसिक व आर्थिक त्रास देत असल्यामुळे आत्महत्या करीत आहे, असे नमूद केले आहे.

मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे सदर कृत्यास मुख्यकार्यकारी अधिकारी सुध्दा जबाबदार आहेत. तक्रारीवरीची दखल घेतली असती तर बुध्दघोष म्हस्के यांचेवर आत्महत्या करण्याची वेळ आली नसती. त्यामुळे बुधदघोष म्हस्के यांना आत्महत्येस प्रव्रुत्त करणा-या संबंधित अधिका-यांवर त्वरित कारवाई करावी. मागासवर्गीय कर्मचारी यांचा हेतुपुरस्सर मानसिक व आर्थिक छळ केल्याप्रकरणी विस्तार अधिकारी एस.के.हेडाऊ यांचेवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा.

पीडित परिवारास न्याय मिळवून द्यावा. ग्रामसेवक बुध्दघोष म्हस्के यांच्या कुटुंबाला अनुकंपा व निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे, रमेश निमसडकर, महासचिव स्वप्निल कांबळे, प्रदीप कांबळे, प्रदीप भगत, मधुर येसनकर, गौतम देशभ्रतार, अध्यक्षा स्मिता नगराळे, श्यामराव डहाके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.