सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी; घरचेच बियाणे वापरण्याचे आवाहन

सेलू तालुक्यातील रेहकी या गावी कृषी विभागाचे कृषी सहायक अनूप गुडवार यांनी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासावी याचे प्रात्याक्षिक करून दाखविले. खरीप हंगाम एक महिन्यावर येऊन ठेपला आहे.

    झडशी (Zadashi).  सेलू तालुक्यातील रेहकी या गावी कृषी विभागाचे कृषी सहायक अनूप गुडवार यांनी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता कशी तपासावी याचे प्रात्याक्षिक करून दाखविले. खरीप हंगाम एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. यावर्षी सोयाबीनचे भाव 6000 ते 7500 रुपये पर्यंत गेल्यामुळे सोयाबीनचे बियाणे फार महाग असण्याची शक्यता राहील.

    ज्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन असेल किंवा बाजारातून घेतलेले असो त्या सोयाबीनची उगवण क्षमता तपासून त्या बियाण्यांचा वापर करावा. सोयाबीनची उगवणक्षमता कशी तपासावी याबाबत रेहकी गावामधे युवा शेतकऱ्यांसमक्ष कृषी सहाय्यक अनूप गुडवार प्रात्याशिक यांनी करुन दाखविले.

    सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यातून प्रतिनिधिक बियाणे एकत्र करून घ्यावे. व त्यातील 100 बियाणे दोन सेमी अंतरावर दहा दहाच्या रांगेत गोणपाट किंवा न्यूजपेपरवर ठेवावे. त्यावर ओलसरपणा यावा यासाठी पाणी शिंपडून गोणपाट किंवा न्यूजपेपरची गोल गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवा. त्यावर अधून मधून दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी शिंपडावे. पाच ते सात दिवसांनी शंभर दाण्या पैकी किती बियाण्यास कोंब आले यावरून उगवणक्षमता ठरते. 100 पैकी 70 बियाण्यांस कोंब आले तर बियाण्याची उगवण क्षमता ही 70 टक्के आहे असे समजावे.

    साधारणपणे 70 टक्के उगवण क्षमतेचे बियाणे एकरी 30 किलो या प्रमाणात वापरावे. बियाण्यांची उगवण क्षमता कमी असेल तर प्रत्येक टक्क्यांमागे अर्धा किलो अधिकचे बियाणे वापरावे. कमी उगवणक्षमता असेल तर ते बियाणे म्हणून वापरू नका, असा संदेश त्यांनी दिला. प्रात्यक्षिक करून दाखवताना गावातील गजानन तिमांडे, किरण मुजबैले, दीपक घुमडे, शुभम धाबर्डे, प्रदीप धानकुटे, हर्षल लाडे, आकाश आडे, मनोज झाडे, प्रतीक कांबळे उपस्थित होते.