सलग पंचवीस दिवस व्यवसाय कसा बंद ठेवणार? व्यापाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

सलग पंचवीस दिवस व्यवसाय कसा बंद करावा असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. सरकारच्या आदेशाने सर्व चक्रावून गेले आहेत. व्यवसाया सोबत जोडलेली कुटुंबे कशी जगवायची आणि याचा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी व्यावसायिकांचे प्रतिनिधी मंडळ जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना भेटायला जाणार आहे.

  वर्धा (Wardha).  सलग पंचवीस दिवस व्यवसाय कसा बंद करावा असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. सरकारच्या आदेशाने सर्व चक्रावून गेले आहेत. व्यवसाया सोबत जोडलेली कुटुंबे कशी जगवायची आणि याचा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी व्यावसायिकांचे प्रतिनिधी मंडळ जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना भेटायला जाणार आहे.

  काल उशिरा रात्री जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी काढलेल्या आदेशामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांना आदेश आल्याची माहिती नसल्याने व्यवसायिकांनी दुकाने उघडली. पुढील पंचवीस दिवस व्यवसाय बंद करून कसे होणार, एप्रिल व मे या दोन महिन्यात व्यवसाय चांगला होतो. मागील वर्षी एप्रिल व मे महिन्यात व्यवहार ठप्प झाले होते. त्याची भरपाई अद्याप भरून निघाली नाही.

  गुढीपाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असतो. सुवर्णकारांसाठी तीन मुहुर्तापैकी महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होते. परंतु या मिनी लॉकडॉउन मुळे व्यवसाय ठप्प राहणार आहेत. तेव्हा जिल्हा प्रशासनाने किमान पाच दिवस दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी याकरिता व्यापारी प्रतिनिधी मंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

  व्यवसायाशी निगडीत कर्मचाऱ्यांची उपासमार
  जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री शिवाय इतर सर्व दुकानदारांना लॉकडॉउनचा आदेश आल्यामुळे या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार आहे. प्रत्येक व्यवसायिकांकडे काम करणारे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाची उपासमार होणार आहे. सोबतच या दुकानांच्या पुढे उभे असणारे हात गाडीवर व्यवसाय करणाऱ्यांची सुद्धा कामे बंद होणार आहे.

  बांधकामाला परवानगी पण…
  सरकारने बांधकाम करण्याला पूर्ण परवानगी दिली आहे. या बांधकामासाठी लागणारे सिमेंट, लोहा, पेंट, हार्डवेअर संबंधातील कच्चामाल विकणारी दुकाने मात्र बंद आहेत. डोळ्यांची दवाखाने सुरू आहेत परंतु चष्मा तयार करणार्यांचे दुकान मात्र बंद असल्याने या आदेशातल्या गोष्टी समजण्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.