कॅन व्यवसायाचा माठाच्या विक्रीवर परिणाम

हाच वर्ग घरी पाणी शुद्धीकरणाचे संयंत्र बसवून शुद्ध पाण्याचा वापर करू लागला. मात्र खेड्यापाड्यातील आणि शहरातीलही सर्वसामान्य व मध्यमवर्गीय नागरिक थंड पाण्यासाठी माठाचाच उपयोग करीत असायचे.

    वर्धा. गेल्या काही वर्षांत थंड पाण्याच्या कॅनचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खेडोपाडी आणि गल्लीबोळातही थंड पाण्याच्या कॅनचे उद्योग सुरू झाले आहे. याचा परिणाम परंपरागत कुंभार व्यवसायावर होत असून उन्हाळ्यात गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांवर आता हळूहळू संक्रात येत आहे. माठाच्या विक्रीवर परिणाम होत आहे.
    पाण्याचा धंदा तसा नवीन नाही. काही दिवसापूर्वी बंद बाटलीमधून पाणी विकले जायचे. या बाटलीबंद पाण्याचा वापर केवळ उच्चभ्रू नागरिकच करायचे.

    हाच वर्ग घरी पाणी शुद्धीकरणाचे संयंत्र बसवून शुद्ध पाण्याचा वापर करू लागला. मात्र खेड्यापाड्यातील आणि शहरातीलही सर्वसामान्य व मध्यमवर्गीय नागरिक थंड पाण्यासाठी माठाचाच उपयोग करीत असायचे. त्यामुळे खेड्यापाड्यातून आणि शहरातूनही माठाला प्रचंड मागणी होती.पण, हल्ली हे दिवस बदलले आहेत. शहरात आणि खेडोपाडी शुद्ध पाण्याचे उद्योग उघडण्यात आले. पाण्याची विक्री कॅनद्वारे होत असल्याने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. एवढेच नाही तर या धंद्यात स्पधार्ही मोठी आहे. सुरूवातीला पाण्याचा हा धंदा सुरू झाला तेव्हा 20 लीटरच्या एका कॅनची किंमत 40 रुपये होती. नंतर हळूहळू या धंद्यात अनेकांनी प्रवेश केला आणि स्पर्धा सुरू झाली.

    पाण्याच्या या कॅनचे दर हळूहळू कमी कमी होत गेले. 40 रूपयांवरून हा दर घरपोच 30 रुपये केव्हा झाला हे कळलेच नाही. आता तर कॅन 20 रूपयाला मिळत आहे. काही विक्रेते तर 15 रूपयांत देत असल्याची माहिती आहे. परिणामी सर्वसामान्यासह मध्यमवर्गीय लोकही या कॅनद्वारे मिळणाऱ्या पाण्याचा वापर करीत आहे. दरम्यान उन्हाळ्यात घराघरातून जो माठांचा मोठा प्रमाणावर वापर होत होता. तो आता कमी कमी होत आहे. दीड दोन दिवसांपर्यंत पाणी थंड ठेवणारे कॅन सहज उपलब्ध होत असल्याने लोकांनीही माठ खरेदी करणे कमी केले आहे.