खुल्या बाजारात कापसाचे भाव पोहोचले ५ हजार ७१५ प्रती क्विंटलवर

येथील बाजार समितीच्या कापूस शेडमध्ये एकूण २३५ लहान-मोठ्या वाहनातून शेतक-यांनी शनिवारी ३ हजार ३३५ क्विंटल कापूस विक्रीस आणला. त्यापैकी १८ वाहनांतील कापूस आधारभूत किमतीमध्ये सीसीआयला विकण्यात आला. २१७ वाहनातील कापसाला खुल्या पद्धतीने विकण्यात आला. खुल्या बाजारात कापसाला ५ हजार ७१५ रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला. हा भाव या हंगामातील सर्वोच्च भाव आहे.

हिंगणघाट (Hinganghat).  येथील बाजार समितीच्या कापूस शेडमध्ये एकूण २३५ लहान-मोठ्या वाहनातून शेतक-यांनी शनिवारी ३ हजार ३३५ क्विंटल कापूस विक्रीस आणला. त्यापैकी १८ वाहनांतील कापूस आधारभूत किमतीमध्ये सीसीआयला विकण्यात आला. २१७ वाहनातील कापसाला खुल्या पद्धतीने विकण्यात आला. खुल्या बाजारात कापसाला ५ हजार ७१५ रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला. हा भाव या हंगामातील सर्वोच्च भाव आहे.

कापसाचा भाव शुक्रवारी ५ हजार ६५० रुपये प्रती क्विंटलपर्यंत गेला होता. शनिवारी ६५ रुपये क्विंटल मागे भावामध्ये वाढ होऊन ५७१५ रुपये पर्यंत कापसाचे भाव पोहोचले. शुक्रवार दिनांक २० नोव्हेंबरपर्यंत येथील बाजार समितीच्या कापूस यार्डमध्ये एकूण ९८ हजार २८८ क्विंटल कापसाची आवक नोंद झाली आहे. यंदा कापूस उत्पादक शेतक-यांना अल्प प्रमाणात एकरी कापसाचे उत्पादन झाले आहे. कापसाच्या उत्पादनावर जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी चालत असतात. फॅक्टरीला लागणारा कापूस कमी येत असल्याने जिनिंग संचालक सुद्धा मोठ्या संकटात पडले आहे. कारण एवढ्या मोठ्या उद्योगाला चालविण्यासाठी रॉ मटेरियलची गरज असते. परंतु, यावर्षी निसर्ग कोपल्याने कोपल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे कापसाचे उत्पादन अल्प प्रमाणात असल्याने जिनिंग उद्योगासमोर सुद्धा मोठे संकट उभे झाले आहे.

दोन केंद्रात सीसीआयची कापूस खरेदी
तालुक्यात एकूण १९ जिनींग आहेत. त्यापैकी साईकृपा जिनींग व पदमावती जिनिंगमध्ये सीसीआयच्या वतीने कापसाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवार पर्यत दोनही जिनींगमध्ये एकूण २ हजार ४०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. कापसाला हमीभावानुसार ५ हजार ८२५ रूपये प्रती क्विंटल भाव देण्यात आला.

मागणीनुसार वाढणार केंद्रांची संख्या
तालुक्यातील उर्वरित १७ जिनींगपैकी कापसाची आवक व मागणीनुसार सीसीआयच्या वतीने कापसाची खरेदी सुरू करण्यात येणार आहे. सध्या या जिनींगमध्ये खुल्या बाजारातील लिलावानुसार खरेदी करण्यात येत आहे. खुल्या बाजारातही कापसाची किंमत ११० रूपयांनी कमी आहे. यामुळे सीसीआयकडे नोंदणी न केलेले शेतकरी आता नोंदणी करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा खुल्या लिलावात कापसाची विक्री करण्याकडे वळले आहे. यावर्षी भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी आनंदीत दिसून येत आहे.