मनुष्यबळासह ऑक्सिजन बेड वाढवा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वच कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वाढविण्याच्या सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

  वर्धा (Wardha).  राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वच कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वाढविण्याच्या सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. ते बुधवार 28 एप्रिल रोजी वर्धा जिल्हा दौऱ्यावर आले असताना जिल्हा शल्यचिकित्सकाच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

  यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या परिस्थितीची माहिती घेतली. फडणवीस यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डची पाहणी करून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्यासोबत जिल्ह्यातील आरोग्याच्या सोयीसुविधेबाबत चर्चा केली. याप्रसंगी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, मिलिंद भेंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

  फडणवीस म्हणाले, सध्या कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यासाठी भविष्यातील गरज लक्षात घेऊन आरोग्य विभागातील यंत्रणा सक्षम करण्यासाठी सर्वच कोविड रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांना सेवा देण्यासाठी ऑक्सिजनसह व्हेंटिलेटर बेड वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आरोग्य विभागात मनुष्यबळ अपुरे असल्याने रुग्णांना सेवा देण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत आहे.

  संसर्गाचा प्रसार वाढत असून इन्फेक्शनचा रेशो 15 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात दिवसागणिक रुग्णांमध्ये वाढ होत असून आणखी कोरोना चाचण्या वाढविण्याची आवश्यकता आहे. जिल्हा समान्य रुग्णालयात असलेल्या विविध सुविधांचा आढावा घेऊन आरोग्य विभागाला काही सूचनादेखील केल्या. राज्यातील चाचण्या वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असून नागपूर, पुणे, मुंबई येथे इन्फेक्शन रेशो जास्त वाढत आहे. तो कमी करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न झाले पाहिजे, असेही  फडणवीस म्हणाले.

  आले अन् निघून गेले
  जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे कोविड आयसोलेशन वार्डला भेट देण्यासाठी आले. पण, त्यांनी वार्डचे बाहेरून निरीक्षण करून काहीक्षण थांबून फोटो घेतल्यानंतर लगेच निघून गेले. त्यामुळे आयसोलेशन वार्डाजवळ उपस्थित असलेल्या वैद्यकीय कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकांकडे ढुंकुनही बघितले नसल्याने त्यांचा भ्रमनिराश झाल्याचे दिसून आले.