लेटलतिफ कर्मचारी आणि अधिका-यांना प्रवेशद्वारावरच रोखले; जिल्हा परिषद अध्यक्षांचा प्रवेशद्वारावर दोन तास ठिय्या

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती या सर्व महिला पदाधिका-यांनी अचानकपणे सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर लेट लतिफ कर्मचा-यांना रोखले. यात विभाग प्रमुखासह 204 अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. लेट लतिफ अधिकारी व कर्मचा-यांना शिक्षा म्हणून एक कुंडी व रोपटे जिल्हा परिषद मध्ये आणण्याच्या सूचना केल्या आहेत.

वर्धा (Wardha).  जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती या सर्व महिला पदाधिका-यांनी अचानकपणे सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर लेट लतिफ कर्मचा-यांना रोखले. यात विभाग प्रमुखासह 204 अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. लेट लतिफ अधिकारी व कर्मचा-यांना शिक्षा म्हणून एक कुंडी व रोपटे जिल्हा परिषद मध्ये आणण्याच्या सूचना केल्या आहेत.

राज्य शासनाने पाच दिवसाचा आठवडा केल्यानंतर शासकीय कर्मचा-यांना सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 यावेळेपर्यंत सरकारी कार्यालयात सेवा द्यायची आहे. कार्यालयात येण्याची आणि जाण्याची शासनाने वेळ निश्चित केलेली असताना दांडी मारून आपल्या सोयीने कार्यालय गाठणा-या कर्मचा-यांची जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, शिक्षण सभापती मृणाल माटे आणि महिला व बालकल्याण सभापती सरस्वती मडावी यांनी पोलखोल केली. सकाळी दहा वाजता सर्व पदाधिका-यांनी जिल्हा परिषदेचे प्रवेशदार गाठले. जिल्हा परिषदेच्या उत्तर व दक्षिण भागांमध्ये असलेले प्रवेशद्वार कर्मचा-यांना बंद करायला लावले. त्यामुळे जिल्हा परिषदेत काम करणा-या प्रत्येक कर्मचा-याला मुख्य प्रवेशद्वारावर येणे भाग पडले. सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये 186 कर्मचारी व अधिकारी उशिरा आले. या कर्मचा-यांना एक कुंडी व रोपटे आणण्यास सांगितले. तर 12 नंतर 18 कर्मचारी उशिरा आले, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. याबाबत मुख्य कार्य अधिका-यांना सूचना केल्या गेली आहे.

यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये सामान्य विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेसरे, शिक्षणाधिकारी सोनवणे आणि वित्त विभागाचे प्रमुख शेळके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. लेट लतिफ कर्मचा-यांचा भोंगळ कारभार व अनास्था समोर आली. पदाधिका-यांनी याबाबत संताप देखील व्यक्त केला.

जिल्हा परिषद अध्यक्षांचा संपूर्ण विभागात फेरफटका
लेट लतीफ कर्मचा-यांच्या स्वागतानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष व पदाधिका-यांनी जिल्हा परिषदेच्या इमारतीत प्रत्येक विभागाला भेट दिली. सोबत स्वच्छता कर्मचा-यांनाही त्यांनी सोबत घेतले. अनेक विभागांमध्ये स्वच्छता नव्हती. विभागाच्या बाजूला असलेल्या गॅलरीमध्ये परिसर पूर्ण अस्वच्छ झालेला दिसला. सोबत आलेल्या कर्मचा-यांकडून कडून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. आणि विभागातील प्रत्येक कर्मचा-यांना तंबी देण्यात आली. पुढील वेळेस कचरा दिसल्यास तो त्या विभागातील कर्मचा-यांना स्वच्छ करावा लागेल.

सर्वात जास्त आरोग्य विभागाचे कर्मचारी उशिरा पोहोचले
जिल्हा परिषदेत एकूण 16 विभाग आहेत. सर्वात जास्त आरोग्य विभाग 34, शिक्षण विभाग प्राथमिक 31, वित्त विभाग 21, बांधकाम विभाग 17, पंचायत विभाग मनरेगा 17, ग्रामीण पाणी पुरवठा 16, सामान्य प्रशासन 13, लघु सिंचन विभाग 13, कृषी विभाग 2, शिक्षण विभाग माध्यमिक 5, भूजल सर्वेक्षण विभाग 6, समाज कल्याण विभाग 8, पशुसंवर्धन विभाग 6, महिला व बालकल्याण विभाग 1, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग 5, निरंतर शिक्षण 1 असा 204 जणांचा आजच्या उशिरा येणा-या कर्मचा-यांमध्ये समावेश आहे.

कर्मचारी व अधिका-यांनी वेळेत यायला पाहिजेत
ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेची स्थापना झाली आहे. कर्मचा-यांनी त्यांच्या कर्तव्याची जाण ठेवून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आता पाच दिवसाचा आठवडा झाल्यानंतर कर्मचा-यांनी काटेकोरपणे आपली सेवा देणे गरजेचे आहे. — सरिता गाखरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद वर्धा.