वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; शेडगाव फाट्यावरील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना नागपूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील शेडगाव फाट्याजवळील हाॅटेल संतराम येथे 4 एप्रिल रोजी सायंकाळी 7.45 वाजताच्या दरम्यान घडली.

    समुद्रपूर (Samudrapur).  अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना नागपूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील शेडगाव फाट्याजवळील हाॅटेल संतराम येथे 4 एप्रिल रोजी सायंकाळी 7.45 वाजताच्या दरम्यान घडली.

    घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर ठाण्याचे ठाणेदार हेमंत चांदेवार आपल्या कर्मचा-यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बोरकर, वनक्षेत्र अधिकारी विजय धात्रक यांना माहिती दिली. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा पंचनामा केला. बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याच्या कानातून, नाकातून रक्त वाहत होते. ही मादी बिबट अंदाजे दोन वर्ष वयाची असावी.

    बिबट्याचा मृतदेह उत्तरिय तपासणीकरिता आजदा येथील रोपवाटिकेत नेण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. स्मिता मुडे, वनरक्षक योगेश पाटील, उमेश बावणे, वाहनचालक अनिल जुमडे उपस्थित होते. हा बिबट मागील सहा महिन्यांपूर्वी राजकीय नेत्याच्या गाडीसमोर आला होता असे समजते. पुढील तपास वनविभाग करीत आहे.

    आजदा येथील रोपवाटिकेत अंत्यसंस्कार
    उत्तरीय तपासणी वन्यजीवरक्षक कौशल मिश्रा, संजय इंगळे तिगावकर, सहायक वनसंरक्षक ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर, डॉ. सोनोने, डॉ. स्मिता मुडे यांच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणी केली. त्यानंतर सदर बिबट्यावर आजदा येथील रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात आले.