लोकमान्य टिळक मार्केट सील; नगरपरिषदेच्या कारवाईनंतर दुकानदारांमध्ये निराशा

वर्धा़ शहरातील लोकमान्य टिळक मार्केटमध्ये नगर परिषदेव्दारे सूचना दिल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत नव्हते. दररोज गर्दी होत असल्याने रविवारी लोकमान्य टिळक मार्केटला सील ठोकण्यात आले.

    वर्धा़ (Wardha).  शहरातील लोकमान्य टिळक मार्केटमध्ये नगर परिषदेव्दारे सूचना दिल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत नव्हते. दररोज गर्दी होत असल्याने रविवारी लोकमान्य टिळक मार्केटला सील ठोकण्यात आले. कारवाईनंतर दुकानदारांमध्ये निराशा व्यक्त करण्यात येत होती.

    दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. परिणामी सकाळी 7 ते 11 पर्यंत अत्यावश्यक सेवेतील भाजी, किराणा आदी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांना कोरोना नियंत्रणाकरिता मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या सूचना प्रशासनाव्दारे देण्यात आली होती. परंतु नगरपरिषदेच्या निरीक्षणानंतर लोकमान्य टिळक मार्केटमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे बाब समोर आली आहे. परिणामी लोकमान्य टिळक मार्केट सील करण्याचा निर्णय नगरपरिषदेव्दारे करण्यात आला. मुख्याधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत मार्केट बंद राहणार आहे.

    दुकानदारांमध्ये निराशा
    या मार्केटमध्ये फळ तसेच भाजींची अनेक दुकाने आहे. सध्या बाजारात फळांची तसेच फुलांची मागणी वाढली आहे. याठिकाणी विविध प्रकारची फळे तसेच भाजी खरेदीला प्राधान्य देण्यात येते. विविध फळे या एकाच ठिकाणी मिळत असल्याने नागरिक येथे फळ खरेदी करण्यास विशेष प्राधान्य देतात. काही दुकानदारांनी हंगामी फळासोबतच इतरही प्रकारच्या फळाचा माल दुकानात भरुन ठेवला होता. आता बाजार बंद झाल्याने दुकाने कशी उघडावी व मालाची विक्री कशी करावी, असा प्रश्न दुकानदारांसमोर उपस्थित झाला आहे. परिणामी दुकानदारांमध्ये निराशा पसरली आहे.