कोरोना नियमांची करा कठोर अंमलबजावणी; मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीनंतर जिल्हाधिकारी यांचे आदेश

राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 21 जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यंत्रणांना कोरोना प्रतिबंधक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच लोकांमध्ये कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    वर्धा (Wardha). राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 21 जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यंत्रणांना कोरोना प्रतिबंधक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच लोकांमध्ये कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधला. रुग्ण संख्येत वाढ होत असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेतला. मागील 9 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान राज्यातील काही भागात रुग्णसंख्येत वाढ होत असून यात विदर्भातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच पॉझिटिव्हीटी रेट 15. 63 टक्के आढळून आला आहे. यामागच्या कारणांचा शोध घ्यावा. त्यासाठी तत्काळ उपाययोजना राबववव्यात, असे ठाकरे यांनी सांगितले.

    याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांची तत्काळ बैठक घेऊन लग्न समारंभ, मेळावे, मोर्चे, सार्वजनिक कार्यक्रम याठिकाणी 50 लोकांपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्याची मंजुरी देऊ नये. रेस्टारन्ट, तसेच गर्दीच्या ठिकाणी संख्येच्या मर्यादेचे घालून दिलेल्या बंधनाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्कचा वापर बंधनकारक करावा. हातांची स्वछता राखली जाईल याची काळजी घ्यावी. शहरात गर्दीच्या ठिकाणी फवारणी आणि हॅन्ड वॉश सेंटर पुन्हा सुरू करण्यात यावेत, असे आदेश दिलेत.

    सर्व खाजगी डॉक्टरांनी ताप, खोकला व कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने कोरोना चाचणी करण्यास सांगणे बंधनकारक करावे. चाचण्यांची संख्या वाढवावी. अती जोखमीचे रुग्ण आणि जेष्ठ नागरिक यांचे सर्वेक्षण सुरू करावे. मोबाईल टेस्टिंग व्हॅन ग्रामीण भागात सुरू करावी. जेणेकरून रुग्णांची चाचणी लवकर होऊन त्यांना तातडीने उपचार घेता येतील, असे जिल्हाधिकारी यांनी अधिका-यांना सांगितले.