मुत्तूट फिनकॉर्प दरोडा प्रकरणातील आरोपींना वर्धा पोलिसांकडून अटक
मुत्तूट फिनकॉर्प दरोडा प्रकरणातील आरोपींना वर्धा पोलिसांकडून अटक

चार कोटी 80 लाख रुपयांचे सोने आणि तीन लाख 10 हजार रुपयांच्या रोख रकमेच्या दिवसाढवळ्या झालेल्या दरोड्यातील दरोडेखोरांना अवघ्या बारा तासात वर्धा जिल्हा पोलिसांनी शिताफीने अटक केली. पूर्ण मुद्देमाल जप्त केला. या दरोड्यात व्यवस्थापक खरा सूत्रधार निघाला. कर्जबाजारीपणामुळे मित्रांची मदत घेत हा दरोडा या पाच आरोपीने टाकल्याचे प्रथम माहिती समोर येत आहेत. याबाबत पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वर्धा (Wardha). चार कोटी 80 लाख रुपयांचे सोने आणि तीन लाख 10 हजार रुपयांच्या रोख रकमेच्या दिवसाढवळ्या झालेल्या दरोड्यातील दरोडेखोरांना अवघ्या बारा तासात वर्धा जिल्हा पोलिसांनी शिताफीने अटक केली. पूर्ण मुद्देमाल जप्त केला. या दरोड्यात व्यवस्थापक खरा सूत्रधार निघाला. कर्जबाजारीपणामुळे मित्रांची मदत घेत हा दरोडा या पाच आरोपीने टाकल्याचे प्रथम माहिती समोर येत आहेत. याबाबत पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वर्धा शहरातील मुख्य रस्त्यावर असणा-या मुत्तूट फिनकार्न फायनान्स कंपनीमध्ये 17 डिसेंबरच्या सकाळी नऊ वाजता कुशल आगाशे याने प्रवेश करून कुरियर घेऊन आल्याचे सांगितले. लिफाफे देण्याच्या निमित्ताने शाखा व्यवस्थापक यांच्या केबिनमध्ये सर्व कर्मचा-यांना एकत्र केले. याच दरम्यान एका महिला कर्मचा-याच्या मानेवर बंदुकीचा धाक दाखवत शाखा व्यवस्थापक व कर्मचा-यांना लॉकरमध्ये ठेवलेले सोने व रोख रक्कम बॅगमध्ये टाकायला सांगितले. व एका महिला कर्मचा-याची दुचाकीच्या गाडीची चावी घेऊन पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळावर भेट दिल्यानंतर गुन्ह्यात शाखेतील व्यवस्थापक खरा सूत्रधार असावा, अशी शंका आल्याने त्याला ताब्यात घेत पुढील सूत्रे हलवली. दरम्यान कुरियर बॉय कुशल आगासे यवतमाळ वरून सकाळी त्याच्या मोटरसायकलने सालोड परिसरातील मारुती मंदिराजवळ आला. मोटरसायकल त्याच ठिकाणी ठेवून ऑटोने बजाज चौक गाठले. तिथून घटनास्थळावर पायी आला होता.

दरोडा टाकल्यानंतर महिला कर्मचा-यांची गाडी बजाज चौकामध्ये ठेवली. तसाच ऑटो करून मंदिराजवळ गेला. मोटर सायकल घेतली व यवतमाळकडे पसार झाला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे, साहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे पथकासह यवतमाळला रवाना झाले. कुशलचा शोध घेऊन तपास केल्यानंतर त्याच्या सहकारी मित्र यवतमाळ येथील धामणगाव रोड करळगाव शिवारातील जंगलात गेले आहे. अशा गुप्त माहितीवरून त्यांचा शोध घेतला. या ठिकाणी दोन गाड्या संशयास्पद उभ्या असलेल्या दिसल्या. त्यामध्ये आरोपी मनीष घोळवे आणि जीवन गिरडकर एका कारमध्ये बसून होते तर कुशल आगाशे आणि कुणाल शेंद्रे राहणार यवतमाळ हे दोन्ही एका दुस-या कारमध्ये बसून असलेले आढळले. यांच्याकडून या गुन्ह्यातील चोरी गेलेल्या 582 सोन्याच्या दागिन्यांच्या पाकीट पैकी 200 पॅकेट ज्याचे वजन दोन किलो 556 ग्रॅम आहे. तीन लाख दहा हजार रुपये पैकी 99 हजार 120 रुपये, 6 मोबाईल 34 हजार रुपये किमतीचे, एक नकली पिस्टल दोनशे रुपये किमतीची, तीन स्कूल बॅग आणि दोन कार पंधरा लाख रुपये किमतीच्या असा चार कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार महेश श्रीरंगे, कुषल आगाशे, मनीष घोळवे, जीवन गिरडकर, कुणाल शेंद्रे या गुन्हेगारांना अटक केलेली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 23 डिसेंबर पर्यंत पोलिस रिमांड केलेला आहे. या गुन्ह्यातील चोरीचा पूर्ण मुद्देमाल अजून जप्त करायचा आहे. पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, प्रभारी पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर नागपूर, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयुष जगताप यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे,पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, सलाम कुरेशी, अशोक साबळे, निरंजन वरभे, संतोष दरगुडे, अनिल कांबळे, प्रमोद पिसे, राजेश जयसिंगपुरे, पवन पन्नासे, संघसेन कांबळे, विकास अवचट, अभिजीत वाघमारे आणि चालक भूषण पुरी यांनी विशेष कामगिरी केली.

दरोडा का बर टाकला ?
या दरोड्यातील मुख्य सूत्रधार महेश श्रीरंग याने पत्नी व त्याच्या मित्राच्या नावावर मुथूट्ट फायनान्स मधून चुकीच्या पद्धतीने कर्ज उचल केली होती. येत्या काही दिवसात फायनान्स कंपनीमध्ये ऑडिट करायला अधिकारी येणार होते. आपण केलेल्या चुकीमुळे कारवाई होऊ शकते आणि रकमेची भरपाई करावी लागेल. या भीतीने हा सगळा दरोड्याचा डाव रचला, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.

कर्जबाजारी मित्रांचा आधार
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराचा सहकारी कुशल आगासे हा कुरियर बॉय पेशाने फार्मासिस्ट आहे. त्याची पत्नी सुद्धा फार्मासिस्ट आहे. यवतमाळ मध्ये त्याचे मेडिकलचे दोन दुकाने सुद्धा होते. या व्यवसायात त्याला खूप नुकसान झाले. लॉकडाऊन पूर्वी त्याने हॉटेल व पाणी बॉटल व्यवसाय सुद्धा केला होता. कोरोणा संक्रमण काळात व्यवसाय बंद पडल्याने लाखो रुपयांचे कर्ज झाल्याने त्याने या गुन्ह्यात सहभागी होण्याकरिता मदत केली. तिसरा आरोपी मनीष घोळवे हा बुकी आहे. शिवाय सरकारी कंत्राटदार सुद्धा आहे. याची शहरानजीक मुख्य रस्त्याला लागून शेती आहे. ही शेती विकून कूशल याला तो पैसे देणार होता. परंतु, शेती विकल्या न गेल्यामुळे त्याने पैसे दिले नसल्याचे कुशल यांनी पोलिसांना सांगितले. मला पैशाची गरज होती. त्यामुळेच मी या गुन्ह्यात सहभागी झालो.

सर्वच गोष्टी संशयास्पद होत्या
या गुन्ह्यातील सर्वच गोष्टी पोलिसांना संशयास्पद वाटल्या. तक्रार दाखल होतास घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिका-यांनी कर्मचा-यांना विचारपूस करणे सुरू केली. यामध्ये ज्या महिला कर्मचा-यांची गाडी चोरीला गेली होती. त्या महिलेला तुझी गाडी आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून जाईल. असे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार महेश श्रीरंगे याने सांगितल्याचे महिला कर्मचा-यांनी पोलिसांना सांगितले. यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे यांनी शाखा व्यवस्थापक महेश श्रीरंगे याला ताबडतोब घटनास्थळावरून ताब्यात घेतले. पुढील तपासाची दिशा सोपी झाली.

नागरिकांनी घाबरू नये
अशा प्रकारच्या अनेक घटना घडतात. त्याचा शोध लावता येतो. ज्या ठेवीदारांच्या ठेवी या फायनान्समध्ये जमा आहे. त्या पूर्ण सुरक्षित आहे. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर त्या ज्यांच्या मालकीच्या आहे त्यांना मिळेल. — प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा.