वर्धा जिल्ह्यातील वायफड गावाजवळील तलावावर आढळलेला नयनसरी बदक !
वर्धा जिल्ह्यातील वायफड गावाजवळील तलावावर आढळलेला नयनसरी बदक !

पक्षी सप्ताहाच्या निमित्याने वर्धा जिल्ह्यातील वायफड गावाजवळील तलावावर पक्षी निरीक्षण करतांना पक्षी अभ्यासक राहुल वकारे यांना नयनसरी बदकांचे दर्शन झाले. ही वर्धेतली पहिलीच नोंद असल्याने वर्धेतील पक्षी वैभवात भर पडली आहे. तसेच जिल्यात आढळणा-या स्थानिक व स्थलांतरीत संकट समीप प्रजातींच्या यादीमध्ये नवीन नोंद झाली आहे.

वर्धा (Wardha).  पक्षी सप्ताहाच्या निमित्याने वर्धा जिल्ह्यातील वायफड गावाजवळील तलावावर पक्षी निरीक्षण करतांना पक्षी अभ्यासक राहुल वकारे यांना नयनसरी बदकांचे दर्शन झाले. ही वर्धेतली पहिलीच नोंद असल्याने वर्धेतील पक्षी वैभवात भर पडली आहे. तसेच जिल्यात आढळणा-या स्थानिक व स्थलांतरीत संकट समीप प्रजातींच्या यादीमध्ये नवीन नोंद झाली आहे.

फेरुगीनस डक किंवा फेरुजिनस पोचर्ड हे सामान्य नाव असणा-या पक्ष्याचे मराठी नाव नयनसरी बदक असे आहे. याचे शास्त्रीय नाव अथ्या न्यरोका आहे. या प्रजाती भारतीय उपखंड, आशिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये स्थलांतर करतात.
या बदकाच्या प्रजाती उथळ ओल्या प्रदेशात राहतात. ज्यात हिरव्यागार उगवलेल्या आणि किरणोत्सर्गी वनस्पती असतात. हे दलदलीचा भाग, तलाव, मडफ्लॅट, माशांचे तलाव आणि किनारपट्टीवरील आश्रयस्थानांमध्ये आढळतात.

मध्यम आकाराच्या बदकाची लांबी 35 ते 40 सेमी आणि वजन 450 ते 750 ग्रॅम असते. नर व मादी दोन्ही गडद तांबूस पिंगट आणि पाठ आणखी गडद रंगाची असते. नर बदकाचे डोळे चमकदार फिकट पांढ-या आणि मादीचे तपकिरी रंगाचे असते. पोट आणि पंखांच्या खालचा भाग पांढरा असतो. हे बदके उडल्यानंतर त्यांच्या वरच्या पंखांवर दोन्ही बाजूने पांढरी पंख पट्टी पहावयास मिळते. पांढरी पंख पट्टी व नराचे चमकदार फिकट पांढरे डोळे या त्याच्या ओळखण्याच्या प्रमुख खुणा आहेत.
या बदक प्रजाती डुबकी मारून किंवा पाणी खळवळून आपला आहार घेतात. ते सर्वभक्षी आहेत. जलीय वनस्पती, अपृष्ठवंशी, किडे, घोन्घे, कठीण कवच असणारे आणि लहान मासे खातात आणि सहसा रात्री आहार घेतात.

ई-बर्ड या संकेत स्थळावरील नोंदीनुसार विदर्भात यापूर्वी यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात या पक्षाची नोंद आहे.  हे बदकं मोठ्या संख्येने व प्रामुख्याने भारतात स्थलांतर करून येत नसून तो शेंडी बदक, मोठी व छोटी लालसरी यांच्या सोबत मोजक्याच संख्येत विदर्भात येतात अशी माहिती यवतमाळ मधील पक्षी अभ्यासक प्रवीण जोशी, नागपूरचे नितीन मराठे, चंद्रपूरचे रुंदन काटकर आणि वाशिम येथील मिलिंद सावदेकर यांनी दिली. यासोबतच 2004 पासून याचे विदर्भात आगमन होत असून राजू कसंबे, जयंत वडतकर, गजानन वाघ, प्रशांत निकम पाटील, सौरभ जवंजाळ, किरण मोरे, रवी धोंगळे, मंगेश तायडे, शिशिर शेंडोकर, शुभम गिरी, कनैया उदापुरे व ईतर पक्षीमित्रांनी स्थानिक तलावांवर याची नोंद केली आहे.

यावर्षी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पहिल्याच पक्षी सप्ताहात वर्धा जिल्ह्यातील पक्षी अभ्यासक राहुल वकारे यांच्या नयनसरी बदकांच्या नोंदीमुळे त्यांचे पक्षीमित्रांकडून विशेष अभिनंदन होत आहे. या पक्ष्याच्या अभ्यासाकरीता दुस-या व तिस-या फेरीच्या पक्षी निरीक्षणामध्ये वन्यजीव अभ्यासक पराग दांगडे, नितीन भोगल व श्रुष्टी भोगल आणि वर्धा जिल्ह्याचे मानद वन्यजीव संरक्षक संजय इंगळे तिगांवकर यांचे सहकार्य लाभले.