नेतेगिरी करत सरकारी कामात अडथळा टाकला; एकावर गुन्हा दाखल

वर्धा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिका-यांनी ३० एप्रिलपर्यंत मिनी लाकडाऊन घोषित केला आहे. मात्र, त्यांच्या आदेशाला न जुमानता व्यावसाय करणा-यांना दुकाने बंद करण्यासाठी बंदोबस्त पथकाने सूचना देण्याचे काम सुरु ठेवले आहे.

    वर्धा (Wardha).  जिल्ह्यामध्ये जिल्हाधिका-यांनी ३० एप्रिलपर्यंत मिनी लाकडाऊन घोषित केला आहे. मात्र, त्यांच्या आदेशाला न जुमानता व्यावसाय करणा-यांना दुकाने बंद करण्यासाठी बंदोबस्त पथकाने सूचना देण्याचे काम सुरु ठेवले आहे. दरम्यान, भाजपच्या पदाधिका-याने पथकातील माईक हिसकावत सरकारी कामात अडथळा निर्माण करून “आ बैल, मुझे मार ” प्रकार केल्याने प्रशांत काकडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

    शहरातील कपडा लाईन परिसरात दुपारी काही व्यावसायिकांचे दुकान सुरू असल्याची माहिती बंदोबस्त पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने या भागात येत व्यावसायिकांना माईकद्वारे आवाहन करत दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, येथे उपस्थित असलेल्या भाजपचे पदाधिकारी प्रशांत काकडे यांनी पथकाला विरोध केला. उपस्थित व्यापारी व त्यांच्या कर्मचा-यांना चिथावणी दिली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशांत काकडे यांनी पथकाजवळील माईक हातात घेवून सदर व्यापा-यांना दुकाने सुरू करा, असे आवाहन केले.

    सोबतच वरिष्ठांसोबत संवाद साधण्यासाटी पथकातील कर्मचारी प्रयत्न करीत असताना त्यांच्या जवळील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पथक परत उपविभागीय कार्यालयात गेल्यावर उपविभागीय अधिका-यांना दिल्या गेली. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जमावबंदी कायदयाचे उल्लंघन केल्याने शहर पोलिस ठाण्यात सायंकाळी मंडळ अधिकारी शैलेश देशमुख यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी प्रशांत काकडे यांच्यावर कलम 353, 188, 269, 186,504,109 नुसारगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.