विनयभंग केल्याप्रकरणी पोस्कोचा गुन्हा दाखल

हिंगणघाट (Hinganghat).  अल्पवयीन बालिकेला चाकुचा धाक दाखवून तिचा विनयभंग करण्यात आला होता. ही घटना तालुक्याच्या काचनगाव येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी स्वप्निल आत्माराम गोटे (24) नामक युवकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

माहितीनुसार काचनगाव येथे राहणारे पीडित मुलीचे आई-वडील बांधकाम नोंदणीचे कार्ड बनविण्यासाठी वर्धेला गेले होते. काम न झाल्याने त्यांनी मुलीला फोन करून आम्ही उद्या येणार आहोत, असे सांगितले. पीडित मुलीला दोन बहिणी अशा तीन मुली रात्री झोपी गेल्या होत्या. तेव्हा आरोपी स्वप्निल गोटे याने रात्री दहा वाजता दार ठोठावले. पीडित मुलीने दार उघडल्यावर आरोपीने चाकू दाखवून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. आरडाओरड केल्याने आरोपी तिथून फरार झाला.

पीडित मुलीचे आई-वडील आल्यावर तिने घटनेबाबत माहिती दिली. त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये घटनेची तक्रार दिली. तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. या प्रकरणी पीएसआय माधुरी गायकवाड तपास करीत आहे.