रेल्वे प्रवासातील गुन्हेगारीत घट; कोरोना काळामुळे झाला परिणाम

कोवीड संसर्ग रोगामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने रेल्वे प्रवासात प्रवाशांची संख्या नगण्य झाल्याने रेल्वे प्रवासात होणा-या गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. प्रवाशांनी नेहमी सतर्क राहावे, असे आवाहन स्थानिक रेल्वे पोलिस प्रशासनाने नवराष्ट्रशी बोलताना केले आहे.

संजय तिगावकर
वर्धा (Wardha). कोवीड संसर्ग रोगामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने रेल्वे प्रवासात प्रवाशांची संख्या नगण्य झाल्याने रेल्वे प्रवासात होणा-या गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. प्रवाशांनी नेहमी सतर्क राहावे, असे आवाहन स्थानिक रेल्वे पोलिस प्रशासनाने नवराष्ट्रशी बोलताना केले आहे.

कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे मार्च महिन्यापासून रेल्वेचा प्रवास काही काळ बंद होता. विशेष गाड्या वगळता रेल्वेच्या प्रवासी गाड्या बंद पडलेल्या आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासात होणा-या गुन्हेगारीचे प्रमाण सुद्धा घटलेले आहे. 2019 मध्ये जानेवारी ते डिसेंबर पर्यंत वर्धा विभागात 557 गुन्हे दाखल झाले होते. यापैकी पंधरा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात 542 चोरीचे गुन्हे आहेत. यात 263 मोबाईलचे गुन्हे आणि बॅग चोरीचे 189 गुन्हे मागील वर्षात दाखल झाले. खिसे कापणारे व दुचाकी चोरी गुन्ह्यांची सुद्धा यात नोंद आहे. तर 2020 मध्ये मात्र होण्याचे प्रमाण एकदम कमी झाले. जानेवारी ते नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत 122 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यात 113 चोरीचे गुन्हे समाविष्ट आहे.

रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील परिसरात गुन्हा झाल्यास नोंद केल्या जातो. त्यामुळे वर्धा शहराच्या लागून असलेल्या स्टेशन फैल परिसरातील खुनाचा प्रयत्न करण्यात आलेला एक गुन्हा व तर खून झाल्याचा गुन्हा बल्लारशा रेंजमध्ये कामर रेल्वे स्टेशन जवळ नोंद केला गेला आहे. बल्लारशापर्यंत वर्धा पोलिसांचे कार्यक्षेत्र असल्याने बल्लारशा परिसरातच एक जबरी चोरी झाल्याची सुद्धा नोंद आहे. या सर्व गुन्ह्यांचे चार्जशीट दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. प्रवास करणा-या प्रवाशांना ऑनलाईन बुकिंग करूनच प्रवास असल्याने प्रवासादरम्यान प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. कोरोना संक्रमणाचा काळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत घट झालेली आहे.

2019 या वर्षामध्ये एकूण 102 मर्ग अनोळखी मृत व्यक्तींची सापडल्याची नोंद झाली. यापैकी 73 व्यक्तींची ओळख पटली तर एकोणवीस इसमांची ओळख पटली नाही. तर 2020 या वर्षात 34 अज्ञात मृत व्यक्तींची नोंद करण्यात आली. यापैकी 29 इसमांची ओळख पटली. पाच लोकांची ओळख पटली नाही. पोलिस या अनोखी अनोखी व्यक्तींचा डीएनए संग्रहित करतात. शिवाय व्यक्तींच्या अंगावरचे कपडे व त्याचा फोटो ठेवतात.

प्रवासादरम्यान चोरीचा प्रयत्न जास्त
कुठल्याही प्रवासात बॅग, सामानाची अथवा मोबाईल चोरी झाल्यावर प्रवाशाला जेव्हा कळते, तेव्हा तो संबंधित ठाण्यात तक्रार करतो. प्रवासादरम्यान झालेल्या चोरीचा उलगडा होण्यास फार अडचण जाते. तेव्हा आपल्या वस्तू सांभाळणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. रेल्वे प्रवासादरम्यान पोलिस प्रवाशांच्या सुरक्षेकरिता रेल्वे गाडी मध्ये प्रवास करीत असतात. सध्या प्रवासी गाड्या बंद असल्यामुळे पोलिसांना परत येण्याकरिता गाड्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या पोलीस पेट्रोलिंग गस्त प्रमाण कमी आहे.

प्रवाशांनी नेहमीच सतर्क राहावे

सध्या रेल्वे प्रवासामध्ये ऑनलाईन बुकिंग करणा-या प्रवाशांनाच प्रवास करता येत आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांशिवाय इतरांना परवानगी नाहीच. तरीसुद्धा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. परंतु, प्रवासादरम्यानच्या घटना मात्र कमी होताना दिसत नाही. प्रवासादरम्यान चुकुन एखाद्या ठिकाणी गाडी थांबल्यावर एखादा गुन्हेगार गाडीत अवैध प्रवास करून चोरी करण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा प्रवाशांनी सतर्क असणे जास्त गरजेचे आहे.
दयानंद सरवदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, रेल्वे स्टेशन वर्धा.