pashu sanwardhan dipartment

  • अर्धेपेक्षा अधिक पदे रिक्त

सचिन म्हात्रे, वर्धा. जिल्ह्याचे  पालकमंत्री सुनील केदार खुद्द राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय मंत्री असतांनासुध्दा जिल्ह्यातील या विभागाचा बोजवारा वाजला आहे. अनेक पदे रिक्त  आहेत. तर, दुसरीकडे पशुपालकांचे गोधनांना दोन महिन्यांपासून अनेक रोगाने ग्रासले आहे. सध्या स्थितीत असलेले कर्मचारी ग्रामीण भागात सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे. यामुळे गोपालकांवर एक नवे आर्थिक संकट उभे राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. याकडे पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष देवुन गोपालकांची समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.

कोरोना प्रादुर्भाच्या काळात सर्व उद्योगावर आर्थिक संकट आले असतांना फक्त कृषी क्षेत्राने मात्र भारताच्या जीडीपीत अधिकचे स्थान मिळविले आहे. शेतकरी खरीप व रब्बी हंगामात आज सुध्दा पशुधनावर अवलंबुन आहे. लवकरच रब्बी हंगामालाही सुरवात होणार आहे. यामुळे पशुधन देखील कामाला लागले आहे. बैलाचा उपयोग शेतीचे कामासाठी करण्यात येत आहे. शेतीला जोडधंदा म्हणूनही अनेक शेतकरी गाय, म्हशी व शेळी पालनाचा व्यवसाय करीत  आहे. सध्या पशुधनांवर लॅम्पी स्कीन डिसीज  व क्रिमीन कोंगो  आजाराने थैमान घातले आहे. यामुळे जिल्हयातील ८५ पशुवैद्यकीय दवाखाण्यात गोपालक  जनावरांना उपचारासाठी  घेऊन येत आहे. या विभागात असलेल्या रिक्त पदामुळे उपचार करण्यात अडचणी येत आहे.
जिल्ह्यातील रूग्णालयात एकूण ११७ पदे  मंजूर करण्यात आली आहे. परंतु, केवळ ४८ कर्मचारी कार्यरत आहेत. विभागात तब्बल ६९ पदे रिक्त आहे. पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक व सफाई कामगारांची प्रत्येकी एक पदे मंजूर असून केवळ हीच पदे पूर्णपणे भरली आहे. विभागात विविध पदापैकी प्रत्येक पदाच्या जागा रिक्त आहेत.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्ताचे एक पद मंजूर असून ते रिक्त आहे. सहायक आयुक्तांची ८ पदे मंजूर असून ५ पदे भरण्यात आली आहे.३ पदे रिक्त आहे. पशुधन विकास अधिका-यांची  ९ पदे मंजूर  आहेत. यापैकी ८ पदे  भरण्यात आली असून १ पद रिक्त आहे. सहायक पशुधन अधिका-यांच्या ७ पदापैकी ३ पदे भरली असून ४ पद रिक्त आहे. वैरण विकास अधिकारी  व सहायक वैरण विकास अधिका-यांचे प्रत्येकी एक-एक पद रिक्त आहे. पशुधन पर्यवेक्षकांचे २२ पैकी केवळ १२ पदे भरण्यात आली आहे. तर दहा पदे रिक्त आहे. यांसह विभागात वरिष्ठ सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, लघुलेखक, नाईक, व्रणोपचारक व शिपाई ही पदे रिक्त आहे. वाहन चालकाची दोनपैकी दोन पदे रिक्त आहे.

परिचरची पदे अनेक वर्षापासून रिक्त
जिल्हयातील विविध पशुसंवर्धन रूग्णालयात परिचरची २५ पदे मंजूर आहे. यापैकी केवळ ८ परिचर विविध रूग्णालयात कार्यरत आहेत. विभागात १७ पदे  तब्बल १५ वर्षापासून रिक्त आहे. परंतु, ही पदे भरण्यात न आल्याने  अधिकारी  व कर्मचा-यांची चांगलीच पंचाईत होत आहे.

कारंजा तालुक्यात सर्वाधिक पदे रिक्त
जिल्हयातील कारंजा तालुक्यात गवळी समाजबांधव मोठया प्रमाणात आहे. गोपालन करणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. या तालुक्यात हेटीकुंडी येथे पशुधन पैदास केंद्र हा मोठा प्रकल्प आहे. यांसह कारंजा मुख्यालय, ठाणेगाव, कन्नमवार ग्राम, चंदेवाणी सावळी, काजळी येथे पशुसंवर्धन दवाखाणा आहे. परंतु, यासर्व पशुसंवर्धन दवाखाण्यात विविध पदे रिक्त असल्याने गोधनावर उपचार करण्यात अडचणी येत आहे. यामुळे गोपालकांना खासगी डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागतात. संधीचा फायदा घेत निशुल्क होणा-या उपचारासाठी ते अधिक रक्कम वसुल करीत आहे.

पदे भरल्यास सोईचे होईल
जिल्हयात पशुसंवर्धन विभागात विविध पदे अनेक वर्षापासून रिक्त आहेत. याचा दर तीन महिन्याचे अहवाल शासनाकडे पाठविण्यात येतो. पदे भरण्याचे अधिकार शासनाकडे आहेत. पदे रिक्त असल्याने कामात  अडचणी येत आहे. रिक्त पदे भरल्यास काम करणे सोईचे होईल.