
हिंगणघाट येथील दालमिलमधून तुरीची दाळ लंपास करणाऱ्या चोरट्यांना डीबी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 6 लाख 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हिंगणघाट (Hinganghat). हिंगणघाट येथील दालमिलमधून तुरीची दाळ लंपास करणाऱ्या चोरट्यांना डीबी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 6 लाख 35 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दालमिलमध्ये काम करणारे मजूरच चोरटे निघाल्याचे समोर आले आहे.
आंजती येथील गोविंद अॅग्रो इंडस्ट्रिज, दालमिलमध्ये ठेवलेल्या तुरीच्या डाळीचे 50 किलोचे 25 पोते त्याची एकूण किमत 1 लाख 25 हजार कोणीतरी चोरून नेले, अशी तक्रार गुरुनानक वार्ड येथील सूरज महेशकुमार मोटवाणी यांनी 4 एप्रिल रोजी हिंगणघाट पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक प्रमुख पो. हवालदार शेखर डोंगरे व त्यांच्या पथकासह हिंगणघाट शहर व लगतच्या परिसरात आरोपीचा शोध घेतला. तसेच फिर्यादीच्या दालमिलमधील मजुराची कसून चौकशी केली असता दालमिलमधील मजूर मागील काही दिवसांपासून हिंगणघाट येथील काही लोकांच्या संपर्कात येऊन दाळीची विक्री करीत आहे.
त्याबाबत तपास केला असता मजूर आरोपी नामे शिवनंदी हरिप्रसाद कनोजिया (वय 20) रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश, रवि एकनाथ माहुरे (वय 26) रा. चंद्रपूर व त्याच्या सोबत हिंगणघाट येथे राहणारा वाहनचालक नामे प्रज्वल अशोक पितळे (वय 20) रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट यांनी संगणमत करून दालमिलमधून तुरीच्या डाळीची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपींना अटक करून न्यायालयात हजार केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
त्यांनी यापूर्वीसुद्धा दोनवेळा तुरीच्या डाळीची चोरी करून हिंगणघाट येथे राहणारा आरोपी शेर अली सय्यद (वय 34) यास विक्री केली आहे. त्यावरून चोरीची दाळ विकत घेणा-या आरोपीस गुन्ह्यात अटक करून यातील चारही आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण माल जप्त केला. त्यात तुरीची दाळ व त्यासाठी वापरेलेले वाहन क्र. एम.एच 32 क्यू 3684 असा एकूण 6 लाख 35 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.