खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू; पाण्यात खेळण्याचा मोह ठरला जीवघेणा

खेळण्यासाठी गेलेल्या दोन 13 वर्षीय बालकांचा खड़्यातील पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 15 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान, देवळी येथील जोशी पेट्रोलपंपाच्या मागील ले- आऊटमध्ये घडली.

    देवळी (Deoli).  खेळण्यासाठी गेलेल्या दोन 13 वर्षीय बालकांचा खड़्यातील पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 15 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान, देवळी येथील जोशी पेट्रोलपंपाच्या मागील ले- आऊटमध्ये घडली. या घटनेने कुटुंबीयावर दुखःचा डोंगर कोसळला असून देवळी शहरावर शोककळा पसरली आहे.

    उबेद अली आसिफ अली (वय 13) रा. खाडे ले-आऊट वॉर्ड क्र.3 पंचशील नगर व तुषार अनिल शेळके (वय 13) वॉर्ड न. 3 पंचशील नगर, देवळी अशी मृत्त बालकांची नावे आहेत. उबेद अली असिफ अली व तुषार अनिल शेळके यांच्यासह इतर दोन बालके असे चारजण खेळण्यासाठी जोशी पेट्रोलपंपामागील ले-आऊटमध्ये खेळण्यासाठी गेले होते. सदर ले-आऊटमध्ये मुरुम काढण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आलेला असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे.

    सदर खड्ड्यात यातील दोन बालके उतरली, पण पाणी जास्त असल्याने ते पाण्यातून वर आलेच नाही. त्यानंतर तेथे उपस्थित इतर दोघे घराकडे धावत सुटले. त्यांनी सदर घटनेची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर कुंटुंबीयासह परिसरातील नागरिक व देवळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

    सदर बालकांना पाण्याबाहेर काढून देवळी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी म्रुत्त घोषित केले आहे. याप्रकरणी देवळी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत कोणतीही नोंद झाली नव्हती. सदर ले-आऊटमध्ये मुरूम काढण्यासाठी एवढा मोठा खड्डा खोदण्यास महसूल विभागाने कशी परवानगी दिली, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.