महामार्गावरील दुभाजक वृक्षारोपणाच्या प्रतीक्षेत; रेडियम पेंट लावण्यात न आल्याने अपघात वाढले

जाम ते वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मुरमाचा भरणा करण्यासह डिव्हायडरवर झाडांची लागवड करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार इबादूल सिद्दीकी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

    समुद्रपूर (Samudrapur).  जाम ते वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मुरमाचा भरणा करण्यासह डिव्हायडरवर झाडांची लागवड करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार इबादूल सिद्दीकी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

    या तक्रारीची दखल घेत नागपूर चंद्रपूर मार्गांवरील काही अंतरापर्यंत वृक्षलागवडीसह डिव्हायडरच्या बाजूला रेडियम पेंट करण्यात आला आहे. मात्र जाम ते नागपूरकडे जाणा-या मार्गावरील डिव्हायडरला अद्यापही वृक्ष लागवडीची प्रतीक्षा कायम आहे. जामवरून नागपूरकडे जाणाऱ्या महामार्गावरील रस्त्याच्या काही भागात चमकनारे रेडियम पेंट अद्यापही लावण्यात आले नसल्याने वाहन चालकांना रस्त्यावरील डिव्हायडर दिसत नाही. यामुळे अपघात घडत आहे. त्यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    संबंधित विभागाला लक्ष देण्याची गरज आहे. नागपूर–चंद्रपूर महामार्गावर संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला मुरमाचा भरणा केला नव्हता तर रस्त्याच्या मध्यंतरी डिव्हायडरमध्ये झाडाची लागवड केली नव्हती. याविषयी चंद्रपूर येथील इबादूल सिद्दीकी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या तक्रारीची दखल घेत संबंधित कंत्राटदाराला उर्वरित कामे करण्यास भाग पाडले.

    त्यामुळे दोन वर्षानंतर या मार्गावर डिव्हाडरमध्ये झाडाची लागवड झाली आहे. तर रेडियम पेंट मारण्यात आल्याने वाहनाचे होणारे अपघात कमी झाले आहे. मात्र जाम ते नागपूर कडे जाणाऱ्या 20 किलोमीटर अंतरापर्यंत अद्यापही सदर काम बाकी आहे. त्यामुळे या मार्गाने नियमित वाहनांचे अपघात होत आहे. याकडे लक्ष देत डिव्हायडरमध्ये झाडे लावण्यासोबतच रेडियम पेंट लावण्याची मागणी केली आहे.