सहायक अभियंत्याला वीज ग्राहकाची मारहाण; दोघांना अटक

वर्ध्याजवळच्या हनुमाननगर परिसरात वीजबिल न भरल्यामुळे शुक्रवारी वीज कनेक्शन कापण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकातील सहायक अभियंत्याला ग्राहकांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

    वर्धा (Wardha).  वर्ध्याजवळच्या हनुमाननगर परिसरात वीजबिल न भरल्यामुळे शुक्रवारी वीज कनेक्शन कापण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकातील सहायक अभियंत्याला ग्राहकांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वर्ध्यातील हनुमाननगर परिसरात शुक्रवारी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीज जोडणी कापण्यासाठी गेले होते.

    या परिसरातील तिवारी नावाच्या ग्राहकाने मागील तीन महिन्यांपासून वीजबिल भरले नव्हते. नोटीस बजावल्यानंतरही तिवारी यांनी त्याला उत्तर दिले नाही. अखेर महावितरणचे पथक वीजजोडणी कापण्यासाठी तिवारी यांच्या घरी धडकले. यावेळी पथकातील सहाय्यक अभियंता संदीप उईके यांना तिवारी बंधूंनी मारहाण केली. उईके यांच्या तक्रारीवरून वर्धा पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.