वर्धेला सहा वर्षांपासून नव्या बसची प्रतीक्षा; विभागात ३० टक्के बसेस दहा वर्षांपेक्षा जुन्या

बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांच्या सेवेत उतरलेल्या एसटी महामंडळाला पुरेशा बसअभावी स्पर्धेच्या युगात टिकणे कठीण झाले आहे. एसटी महामंडळाच्या वर्धा विभागात मागील सहा वर्षांपासून एकही नवीन लालपरी बस दाखल झालेली नाही.

    रामेश्वर काकडे
    वर्धा (Wardha). बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन प्रवाशांच्या सेवेत उतरलेल्या एसटी महामंडळाला पुरेशा बसअभावी स्पर्धेच्या युगात टिकणे कठीण झाले आहे. एसटी महामंडळाच्या वर्धा विभागात मागील सहा वर्षांपासून एकही नवीन लालपरी बस दाखल झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या बसवर सेवा द्यावी लागते.

    सध्या विभागात जवळपास तीस टक्के बसेस या दहा वर्षांपेक्षा अधिक चाललेल्या असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. वर्धा विभागात आजघडीला एकूण 230 बसगाड्या आहेत. त्यात दहा वर्षे जुन्या व दहा लाख किलोमीटरपेक्षा अधिक झालेल्या अनेक गाड्या आहेत. त्यापैकी जवळपास 65 ते 70 बसगाड्या खिळखिळ्या झालेल्या आहेत. सदरच्या बसच्या काचा फुटलेल्या असून सिटही फाटलेल्या आहेत. अशा बसमधून प्रवाशांना प्रवास करण्याची वेळ आली आहे. याशिवाय वाहक- चालकांची संख्या मोठी असली तरी त्या तुलनेत ही संख्या अपुरी आहे.

    परिणामी अनेक चालकांना डबल फेऱ्या करण्याची वेळ येते. त्यामुळे उपलब्ध वाहक- चालकावर अधिक ताण पडत आहे. एसटी महामंडळात दाखल झालेल्या बसचे इंजिन त्याला १० लाख किलोमीटर चालल्यानंतर बदलले जाते. मात्र, त्यानंतर बसवण्यात आलेले इंजिने 5 लाख किलोमीटरपर्यंत चालविले जाते. बसची वैधता दहा वर्षापर्यंत यापूर्वी होती. मात्र आता आरटीओच्या नवीन नियमानुसार बारा वर्षानंतर एसटी बस मोडीत काढण्यात येत आहे. असे असले तरी 2015 पासून वर्धा विभागीय कार्यालयासाठी एकही नवी लालपरी दाखल झालेली नाही. वर्धा येथील बसस्थानकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले असले तरी बसेस मात्र भंगार आहेत.

    २८० बसची आवश्यकता
    वर्धा विभागात आज घडीला 230 तसेच प्रवाशांच्या सेवेत असल्या तरी त्या अपुऱ्या पडतात. त्यामुळे कर्मचार्‍यांनाही डबल ड्युटी करण्याची वेळ येते. त्यासाठी प्रवाशांना वेळेवर सुविधा पुरविणे शक्य होत नाही. यासाठी वर्धा विभागात किमान 275 ते 280 बसची आवश्यकता आहे.

    शिवशाही- विठाईचे अधिक तिकीट 
    शासनाने गेल्या काही वर्षांमध्ये वर्धा विभागासाठी चार शिवशाही आणि चार विठाई अशा एकूण आठ बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लांब पल्ल्यासाठी या बसचा वापर केला जातो. मात्र, सदर बसचे तिकिट दर हे लालपरी पेक्षा अधिक असल्याने सामान्य प्रवासी या बसने प्रवास करणे टाळतो. त्यामुळे या नवीन आठ बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊनही सामान्यांना आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नाही.

    ५० बसचा प्रस्ताव धूळखात
    एसटी महामंडळाच्या वर्धा विभागाकडून 50 बस मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून वर्धासाठी बसेस उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तेव्हापासून आजपर्यंत एकही बस उपलब्ध होऊ शकली नाही. हा प्रस्ताव शासनाकडे धूळखात आहे.

    बसअभावी नियोजन कोलमडले
    मागील सहा वर्षांपासून एकही नवीन बस दाखल नसल्याने उपलब्ध असलेल्या बसवरच एसटीला आपला गाडा चालवावा लागत आहे. बसची संख्या अपुरी असल्याने अनेक आगाराचा कारभार ढेपाळला आहे. त्याचा परिणाम प्रवाशांची तारांबळ होत असून वेळापत्रकही कोलमडले आहे. त्यामुळे अनेक बस वेळेवर सुटू शकत नाहीत आणि उशिराने सोडल्या जातात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.