वर्धा पोलिसांवर गोळीबाराचा लागला छडा; दोन लाखांची सुपारी देऊन हत्याकांड घडविल्याचे तपासात आले पुढे

12 ऑगस्टला येणोरा ते हिंगणघाट या रोडवर आरोपीने त्यांच्याकडे असलेल्या देशी कट्याने पोलिसांवर दोन काडतुस फायर केले. त्यावेळी पो. उपनि. अमोल लगड, शेखर डोंगरे व त्यांच्या पथकाने जिवाची पर्वा न करता आरोपींचा पाठलाग करून प्रत्युतरादाखल गोळीबार केला होता.

  हिंगणघाट (Hinganghat) : देशी कट्याने पोलिसांवर दोन काडतुस फायर करणा-या आरोपीची पोलिस कोठडीत कसून चौकशी केल्यानंतर मुख्य सूत्रधार आरोपी तिसराच असल्याचे समोर आले. दोन लाखात जीवे मारण्याची सुपारी देणा-या आशीष भोलानाथ राऊत (accused Ashish Bholanath Raut) या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने वरोरा (the local crime branch from Warora) येथून मंगळवारी अटक केली आहे.

  पोलिसांनी यापूर्वी 13 ऑगस्ट रोजी आरोपी जिशान शेख उर्फ जितेंद्र महेश गुप्ता (वय 21) ग्राम सुलधरा बिहार ह. मु. गडचिरोली व एका विधी संघर्षित बालकाला अटक केली होती. तर मंगळवार 17 रोजी आशीष भोलानाथ राऊत (वय 29) रा. येणोरा ता. हिंगणघाट यास अटक केली. सदर आरोपीकडून गुन्हयातील दुचाकी क्र. एम एच. 34 AG 6352 (किमत 50 हजार), चार मोबाईल संच, दोन सिमकार्ड, दुचाकी क्र. एम-एच 32 AA 0822 (किंमत 50 हजार), एक लोखंडी देशीकट्टा 8 हजार, तीन जिवंत काडतुस 900 रुपये, दोन खाली केस काडतुस, आरोपीचे कपडे, आधारकार्ड, काळी बॅग, दुचाकीचे कागदपत्रे आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

  हिंगणघाट पोलिस ठाण्यात फिर्यादी कमलाकर धोटे यांच्या तक्रारीवरून भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद असून सदर गुन्हयाचा तपास पोउपनि अमोल लगड हे करत होते. 12 ऑगस्टला येणोरा ते हिंगणघाट या रोडवर आरोपीने त्यांच्याकडे असलेल्या देशी कट्याने पोलिसांवर दोन काडतुस फायर केले. त्यावेळी पो. उपनि. अमोल लगड, शेखर डोंगरे व त्यांच्या पथकाने जिवाची पर्वा न करता आरोपींचा पाठलाग करून प्रत्युतरादाखल गोळीबार केला होता. सदर आरोपीचा त्याच परिसरात शोध घेऊन त्यांना अटक केली. विधीसंघर्षित बालकास न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले. तसेच पोलिस कोठडीमध्ये असलेला आरोपी जितेंद्र महेश गुप्ता याची गुन्हयाच्या अनुषंगाने कसून चौकशी केली.

  दरम्यान आरोपीने सांगितले की, येणोरा गावातील आशीष भोलानाथ राउत (वय 29) ता.हिंगणघाट याचे त्याच गावातील राजपाल शंकर फुलझेले याच्या पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयावरून राजपाल फुलझेले हा जानेवारी महिन्यात आशीष राऊत याच्या मागे कुऱ्हाड घेऊन धावला होता. परत गावात दिसल्यास जिवाने ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आशीष राऊत हा राजपाल फुलझेले याच्या भितीने गाव सोडून वरोरा येथे राहत होता. त्यादरम्यान, आशीष राऊत याने जितेंद्र गुप्ता व विधीसंघर्शीत बालकासोबत संधान साधून राजपाल शंकर फुलझेले यास जिवानीशी ठार मारण्यासाठी 2 लाख रुपयांची सुपारी दिली.

  पुर्वतयारीकरिता 60 ते 70 हजार रूपये खर्च करून गुन्हेगारी कट रचला. 12 ऑगस्टला कटाप्रमाणे जिवाने ठार मारण्याचे ठरले होते. परंतु, त्याचदिवशी आरोपीच्या शोधावर असलेले पोउपनि अमोल लगड तसेच शेखर डोंगरे व त्यांच्या पथकाच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव उधळला गेला.

  सदर प्रकरणाचा मास्टर माईंड आरोपी आशीष भोलानाथ राऊत याचा शोध घेऊन त्यास विचारपुस केल्यानंतर त्याने गुन्हा कबुल केला. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, सादिक शेख, शेखर डोंगरे व पथक, उमाकांत लडके, मनोज लोहकरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, नीलेश कट्टोजवार, दिनेश बोथकर यांनी केला.