वर्धेच्या मुलीचा बालविवाह अमरावतीत रोखला; मुहुर्ताच्या १० मिनिटाआधी बालसंरक्षण कक्षाची धडक कारवाई

वर्धा येथील मुलीचा बालविवाह अमरावतीत होत असताना मुहुर्ताच्या 10 मिनिटाआधी रोखण्यात आला. ही धडक कारवाई जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या वतीने मंगळवारी सकाळी 10 वाजता करण्यात आली.

    वर्धा (Wardha).  वर्धा येथील मुलीचा बालविवाह अमरावतीत होत असताना मुहुर्ताच्या 10 मिनिटाआधी रोखण्यात आला. ही धडक कारवाई जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या वतीने मंगळवारी सकाळी 10 वाजता करण्यात आली.

    सविस्तर वृत्त असे की, वर्धा येथील जिल्हा बालसंरक्षण अधिकारी माधुरी भोयर यांनी मंगळवारी 16 मार्च सकाळी 10 वाजता वर्धा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील तरोडा या गावी होत असल्याची माहिती अमरावती येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांना दिली. डबले यांनी तत्काळ दखल घेऊन सदर प्रकरणाची चौकशी करून चांदुर रेल्वे ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना सदर घटना सांगितली. त्यानंतर 3 पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन वाहनाने विवाहस्थळ गाठले.

    सदर ठिकाणी मंगलाष्टके चालू होती. वेळीच तेथे हस्तक्षेप करून ते थांबविले व गावातील सरपंच, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका यांना या ठिकाणी बोलविण्यात आले. त्यांना प्रथमतः सदर विवाह हा बालविवाह असून बालविवाह प्रतिबंध कायद्याअन्वये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे, अन्यथा तो बालविवाह ठरतो, अशी माहिती देण्यात आली. तेथील वधू-वर, त्यांचे नातेवाईक, गावकरी यांची समजूत काढण्यात आली.

    सदर विवाहाला स्थगिती देऊन वधू-वर, नातेवाईक यांना बालकल्याण समितीसमोर हजर करणे आवश्यक आहे, अशी माहिती दिली. सर्वांना सोबत घेऊन बालकल्याण समिती अमरावती यांच्यासमोर हजर करण्यात आले. बालकल्याण समिती सदस्या मीना दंढले, अंजली घुलक्षे यांच्या समक्ष वधू-वर, नातेवाईक, सरपंच, अंगणवाडी सेविका यांचा जबाब/ हमीपत्र लिहून घेण्यात आले. सदर बालिकेला दर 15 दिवसांनी बालकल्याण समिती समक्ष हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. ही कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, सामाजिक कार्यकर्ते मनीषा फुलाडी, जिल्हा बालसंरक्षण कक्षातील कर्मचारी यांच्याकडून करण्यात आली.

    एका अल्पवयीन बलिकेचा बालविवाह थांबविण्यात आला. महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या आदेशानव्ये बालविवाह थांबविण्याची कार्यवाही करण्यात आली. जिल्हा बालसंरक्षण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर प्रकरणात मोलाची भूमिका बजावली.