अवैध वृक्षतोडीचा सूत्रधार कोण ? न.प.ची अज्ञाताच्या विरोधात पोलिसात तक्रार

वर्धा (Wardha): नगरपरिषदेने दोन वेगवेगळ्या घटनेची वर्धा शहर ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात वृक्षतोडीची तक्रार दाखल केली आहे. या वृक्षतोडीचा खरा सूत्रधार कोण आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नगरसेवकांच्या तक्रारीवरून पटेल चौक परिसरातील भागात अवैध वृक्षतोड केल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर आज मुख्याधिकारी विपुल पालीवाल यांचे आदेशावरून सहाय्यक अभियंता संदीप धोईजड यांनी अज्ञात इसमाच्या विरोधात वृक्षतोड केल्या बाबत तक्रार दाखल केली. याकरिता सहाय्यक नगररचना अभियंता आदिश्री धोंडरीकर व कर निरीक्षक शैलेश बिराजदार या दोन अधिका-यांची समिती नेमण्यात आली होती.

नगरपरिषदेने या वृक्षतोडी करिता कंत्राटदाराला कुठलाही आदेश दिला नव्हता. समितीने परिसरामध्ये माहिती घेतली असता नगरपरिषदेचे कोणीतरी कर्मचारी इथे आल्याचे या भागातील लोकांनी सांगितले. परंतु, कुणाचेही नाव माहित नसल्याने अज्ञात इसमाच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली.

गांधीनगर परिसरात सुद्धा अवैध वृक्षतोड झाल्याची तक्रार प्राप्त झाली. या घटनेची तक्रार सुद्धा अज्ञात इसमाच्या विरोधात आज पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली. नगरपरिषदेने ज्या कंत्राटदाराला काम दिले. त्याच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली नाही. विशेष म्हणजे हा ठेकेदार यापूर्वी एका ठेकेदाराकडे मजुराचे काम करीत होता. शहरातील मोठ्या प्रमाणात वृक्षांची अवैध तोड इतका सामान्य मजूर कसा करेल? याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. या ठेकेदारामागे कोणीतरी नगरपरिषदचे तर अधिकारी, पदाधिकारी किंवा नगरसेवक पाठीशी असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. अवैध वृक्षतोड केल्यावर गुन्हा दाखल होतो. हे माहित असताना सुद्धा शहरातील वृक्षतोड करण्याकरिता कोणीतरी सूत्रधार असल्याचे बोलल्या जाते. पोलिसांनी महाराष्ट्र शासन वृक्ष संरक्षण कलम 21 अंतर्गत अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अवैध वृक्षतोड करीत असल्यास कळवा
अतिधोकादायक वृक्षांची तोड करण्यासाठी नगर परिषद परवानगी देत असते. विनापरवानगी कोणीही आपल्या परिसरात अवैध वृक्षतोड करीत असल्यास तत्काळ नगरपरिषदेला कळवा. — विपुल पालीवाल, मुख्याधिकारी, नगर परिषद वर्धा

नगरसेवकांच्या तक्रारीला महत्त्व नाही काय?
नगरसेवकांनी लेखी तक्रार दिली असताना प्रशासनाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करणे हे आश्चर्यजनक आहे.नगरसेवकाच्या तक्रारीला काही महत्त्व आहे की नाही? पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
— जयंत सालोडकर, स्वीकृत नगरसेवक, नगर परिषद वर्धा.