धारदार शस्त्रासह युवकास अटक; आर्वी नाका परिसरात दहशत

वर्धा. चाकुचा धाक दाखवित युवकांना धमकी देण्यात येत होती. चायनीच सेंटर चालकाने हटकले असता रागाचे भरात आलेल्या युवकाने त्याला रस्त्यावर ओढत आणले. त्याला चाकु मारण्याचा प्रयत्न करीत असतांना परिसरात उपस्थित तीन पोलिस कर्मचा-यांनी हल्ला करणा-यास ताब्यात घेतले.

यामुळे अनुचित घटना टळली. ही घटना आर्वी नाका परिसरात गुरूवारी रात्रीचे दरम्यान घडली. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. माहितीनुसारआर्वी नाका चौकात वडर झोपडपट्टी येथील  माचीस नामक युवक गुरुवारी रात्री  ८.३० वाजताचे दरम्यान  चाकू घेऊन परिसरात दहशत पसरवित होता. शिवाजी चौकाकडे  जात असलेल्या मार्गावरील चायनीज सेंटरचे मालकाने त्यास हटकले.

त्यामुळे रागाचे भरात आलेल्या  माचिसने  त्यांचे कॉलर पकडुन  रस्त्यावर आणले.  त्यास  मारहाण करण्यात आली व दुभाजकावर पाडले.  ही बाब चौकात उभ्या असलेल्या तीन  पोलिस कर्मचा-यांच्या  लक्षात येताच ते घटनास्थळी पोहोचले. माचिस चायनीज सेंटरचे मालकास  चाकू मारण्याचे प्रयत्नात असतांना  तीन पोलिसांनी त्याला पकडले. एकाने  चाकू हिसकला.

याच झटापटीत एकाचे हाताला चाकू लागला.  परंतु, तीनही पोलिस कर्मचा-यांनी वेळीच युवकास ताब्यात घेतले. तिनही पोलिस कर्मचारी गुन्हे शाखेचे असल्याचे सांगण्यात येते. माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याची चमु घटनास्थळी पोहोचले. त्यांनी माचिस नामक आरोपीस ताब्यात घेतले. त्याचेकडून चीनी बनावटीचा चाकू जप्त करण्यात  आला आहे. शहर पोलिसांनी हत्यार कायदया नुसार  आरोपी माचिसवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास करण्यात येत आहे.