बियाणे, खतांच्या किमतीत २५ टक्के वाढ; दरवाढीमुळे पेरणीही महागणार

पुढील आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाने खतांच्या किमतीमध्ये जवळपास 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रति बॅग 200 ते 300 रुपये वाढ होणार आहे. महागाईचा आगडोंब सर्वदूर पसरला असताना खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी चिंतित आहे.

  गणेश भालेराव
  वाशीम (Washim). पुढील आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाने खतांच्या किमतीमध्ये जवळपास 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रति बॅग 200 ते 300 रुपये वाढ होणार आहे. महागाईचा आगडोंब सर्वदूर पसरला असताना खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी चिंतित आहे. शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. येत्या खरीप हंगामात त्याचा परिणाम दिसत आहे.

  रासायनिक खतांचा शेतीवर विपरीत परिणाम होत असल्याची ओरड होत असली तरी एकरी उत्पादन वाढीसाठी शेतकरी रासायनिक खतांची मदत घेतो. तसेच रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. रासायनिक खत शेतीचा अविभाज्य घटक बनला आहे. शेतीच्या एकूण उत्पादन खर्चात रासायनिक खतांवर होणाऱ्या खर्चाचा वाटा जवळपास 20 टक्के आहे.

  गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीने कहरच केला आहे. सध्या 99 रुपये प्रति लिटर पेट्रोल, तर डिझेलही 90 रुपयांवर पोहोचले आहे. पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे शेतीविषयी होणाऱ्या व्यवहारावरही त्याचा परिणाम होणार आहे. मशागतीसाठी लागणाऱ्या वाहनांचे दर डिझेल दरवाढीमुळे अडीच ते तीन हजार रुपयांनी वाढले आहेत. इंधन दरवाढीमुळे आधुनिक पद्धतीने शेती मशागत करण्यासाठी मागील वर्षापेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा इंधन दरवाढीमुळे उत्पादन खर्च जास्त वाढला आहे.

  वाढलेली महागाई, शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेती व्यवसाय नकोच अशी धारणा शेतकऱ्यांची बनली आहे. मात्र, नाइलाजाने शेती करावी लागते. अशावेळी राज्य आणि केंद्र सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. 2016 पासून आतापर्यंत नापिकी, वातावरणाचा फटका आदी बाबींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात आता 2021 मध्ये शेतकऱ्यांना लागणारे बियाणे, रासायनिक खतांचे भाव वधारणार असल्यामुळे शेतकऱ्यांना नव्या संकटाशी दोन हात करावे लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांतून आंदोलनाचा स्वर ऐकू येत आहे.

  महागाईमुळे शेतकरी मेटाकुटीस
  शेतमालाचे दळणवळण, मशागतीसाठी लागणारे इंधनाचे दर दिवसागणिक नवे उच्चांक प्रस्थापित करत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मशागत करणे सुद्धा महाग झाले आहे. तसेच खताच्या किमती वाढत असल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. वाढणारे कर्ज, कवडीमोल भावाने विकला जाणारा शेतीमाल आणि आता होणारी दरवाढ यामुळे कसा सामना करावा ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. किमती कमी करून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, कृषिपंपाची वीज कापू नये. — वसंतराव धाडवे, सामाजिक कार्यकर्ते, वाशीम

  दुष्काळात तेरावा महिना
  अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आणि या हंगामात दरवाढीची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या समोर असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती आहे. पावसाच्या लहरीपणामुळे पाच वर्षापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून उत्पादनात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.  — बालाजी मडके, शेतकरी, चामुंडा देवी

  सोसावी लागणार महागाईची झळ
  शेतकऱ्यांना आधीच कोणी वाली राहिलेला नाही. अशातच वाढत्या माहागाईच्या झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत. शासनाने शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन कमी दराने बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे. — नामदेव इंगोले, शेतकरी शिवचौक, वाशीम