वाशिम जिल्ह्याच्या विकासाकरिता ३२ कोटींचा निधी मंजूर; खासदार भावना गवळी यांची माहिती

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील रस्ते विकासाकरिता तब्बल ३२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती खासदार भावना गवळी यांनी दिली आहे. लोकसभेत जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित केला.

    वाशिम (Washim).  केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील रस्ते विकासाकरिता तब्बल 32 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे अशी माहिती खासदार भावना गवळी यांनी दिली आहे. लोकसभेत जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित केला असता ना. गडकरी यांनी वाशीम जिल्ह्याला भरभरून निधी देऊ असे आश्वासीत केले होते. त्यानुसार ना. गडकरी यांनी सदर निधी मंजूर करून दिला आहे.या निधीतून जिल्ह्यातील रस्ते कात टाकणार आहेत.

    यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील 90 टक्के रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडून व उर्वरीत रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्याची मागणी ना.गडकरी यांच्याकडे प्रश्नोत्तराच्या तासामध्ये केली होती. त्यानंतर मतदार संघातील महत्वाच्या रस्त्यासह ना.नितीन गडकरी यांची 24 मार्च 2021 रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन उर्वरीत रस्ते करण्यासंदर्भातील निवेदन दिले. याबाबत रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी रिसोड शहरातील रस्त्यासह जिल्ह्यातील कारंजा, मानोरा, वाशीम या तालुक्यातील रस्ते राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत मंजुर करू असे आश्वासन दिले.

    त्यानुसार या निधीअंतर्गत प्रोच सोनाटी, गोंडाळा, मांगूळ झनक व गोवर्धन, पारडी, बेलखेड, रिसोड यासाठी 4 कोटी 91 लाख, शिरपूर-करंजी, तामशी, वाशीम रोड (एमडीआर-5)साठी 5 कोटी 85 लाख, कारंजा धनज रोड (एमडीआर-25) ता.कारंजा यासाठी 14 कोटी 73 लाख, आमगव्हाण ते भोयणी फाटा ता.मानोरा यासाठी 6 कोटी 88 लाख असा एकूण जिल्ह्यातील चारही रस्त्याकरिता 32 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती खा.भावनाताई गवळी यांनी दिली. तसेच खा.भावना गवळी यांनी केलेल्या चारही रस्त्यांच्या कामाची मागणी मंजूर झाली असून प्रशासकीय बाबी पूर्ण करून लवकरच कामाला सुरवात होणार आहे अशी माहितीही दिली आहे.