‘आई जगदंबा ग्रुप’चा तरुणाला मदतीचा हात; नोकरदारांची गावाशी नाळ कायम

पित्याचे छत्र हरविलेला ब्रम्हा गावातील मनोज संजय मुसळे हा तरुण संघ लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्याला युपीएससीची तयारी करताना आर्थिक अडचण येत होती.

    वाशिम (Washim).  पित्याचे छत्र हरविलेला ब्रम्हा गावातील मनोज संजय मुसळे हा तरुण संघ लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी परीक्षेची तयारी करीत आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्याला युपीएससीची तयारी करताना आर्थिक अडचण येत होती. यासाठी आई जगदंबे व्हाटसअप ग्रुपवर काही जणांनी मदतीचे आवाहन केले. अवघ्या सात दिवसात तब्बल 74 हजारांचा निधी जमा करुन हा निधी मनोजला सुपूर्द करण्यात आला.

    मनोजचे पुढील शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार झाले आहे. अल्पभूधारक कुटुंबातून आलेल्या मनोजला त्याच्या भावाने पाठबळ दिले,दोन वेळा संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसण्याची संधी दिली. दुस-या वेळी मुख्य परीक्षेत मनोज अपयशी ठरला. आता तिसरी संधी घेण्यासाठी त्याच्यासमोर आर्थिक समस्या उभी राहिली.आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या भावाला इच्छा असूनही काही करता आले नाही. तालुक्यातील ब्रह्मा गावातील अनेक नागरिक व युवा पिढी विविध ठिकाणी नोकरी करीत आहेत. परंतु त्यांची गावाशी नाळ अद्यापही घट्ट जोडलेली आहे.अशातच ‘आई जगदंबे’ या ग्रुपवर मनोजची आर्थिक परिस्थिती सांगणारा संदेश आकाश मुसळे यांनी पोस्ट केला.

    मनोजला युपीएससीच्या तिस-या संधीसाठी 73 हजार रुपयांची आवश्यकता आहे. केवळ आर्थिक कारणांमुळे एका युवकाचे परिश्रम वाया जावू नये, त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन ग्रुपचे सदस्य महादेव मिटकरी, शिवाजी मुसळे, ज्ञानबा मुसळे यांनी केले. तसेच इतरांनाही तसे आवाहन केले. त्याच दिवशी ज्ञानबा शामराव मुसळे यांनी तब्बल 11 हजार रुपयांची मदतराशी देऊन या शुभकार्याला सुरवात केली. ग्रुपमधील प्रत्येक सदस्याने किमान 500 रुपयांपासून ते आपल्या क्षमतेनुसार कितीही मदत करावी,असा निर्णय घेण्यात आला.आणि आश्चर्य ! केवळ पाच-सहा दिवसांत 74 हजार 414 रुपयांचा निधी जमा झाला. ग्रुपच्या निवडक सदस्यांनी मनोजला 73 हजार रुपये निधी सुपूर्द करून त्याला परीक्षेसाठी शुभेच्छाही दिल्या.