नाल्याची सफाईसह रस्ते दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वाशीम शहरातील अकोला नाका परिसरातील आनंदवाडी प्रभागातील नाल्यांची साफसफाई, रस्ते दुरुस्ती करण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. यासोबतच प्रभागात असलेली हापशीही गेल्या अनेक महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहे.

    वाशीम (Washim).  शहरातील अकोला नाका परिसरातील आनंदवाडी प्रभागातील नाल्यांची साफसफाई, रस्ते दुरुस्ती करण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे. यासोबतच प्रभागात असलेली हापशीही गेल्या अनेक महिन्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहे. नगरपरिषद प्रशासनाचे या प्रभागाच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असून त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यासदंर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रभागातील समस्या निकाली न काढल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

    पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांच्या मार्गदर्शनात मनसे सैनिक प्रतीक कांबळे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, शहरातील आनंदवाडी परिसरात रस्ते, नाल्यासह इतर मूलभूत सुविधा मोडकळीस आल्या आहेत. या प्रभागात नगरपरिषदेने केलेली हापशी अनेक महिन्यापासून नादुरुस्त आहे. त्यामुळे सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. प्रभागात अनेक ठिकाणचे रस्ते नादुरुस्त आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून चालताना नागरिकांना त्रास होत आहे.

    सदर रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. यासोबतच प्रभागातील नाल्यांची नगरपरिषद आरोग्य विभागाच्या वतीने नियमित साफसफाई केली जात नाही. त्यामुळे नाल्यांमध्ये सांडपाणी साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आनंदवाडी परिसरातील वरील समस्या निकाली काढणे आवश्यक आहे. आवश्यक ती उचित कारवाई तातडीने करण्याची अपेक्षा असून रहिवासींच्या समस्यांकडे टाळाटाळ झाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.