प्रशासनाची व्हाट्सअप ग्रुप अ‍ॅडमिनने घेतली धास्ती; अनेक ग्रुपच्या सेटिंगमध्ये झाले बदल

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा जीव तोडून काम करत आहे. असे असताना मात्र, सोशल मीडियातून उलट सुलट संदेश प्रसारित करून अफवांना उधाण आले आहे.

    संजय बयस.
    शिरपूर जैन. (Shirpur Jain).  कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा जीव तोडून काम करत आहे. असे असताना मात्र, सोशल मीडियातून उलट सुलट संदेश प्रसारित करून अफवांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सायबर सेलने थेट कारवाईचा इशारा दिल्यानंतर, अनेक व्हाट्सअप ग्रुप अ‍ॅडमिनकडून सेटिंग बदलवण्यात येत आहे. काही ठिकाणी बनवण्यात आलेले ग्रुप देखील डिलीट केले जात आहेत. प्रशासनाच्या निर्णयामुळे व्हॉट्सअप ग्रुप अ‍ॅडमीनने धास्ती घेतली असल्याचे दिसून येत आहे.

    कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी जमावबंदी व संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत. अशा परिस्थितीत सोशलमीडिया विशेष करून व्हाट्सअप वरून प्रसारित होणार्‍या कोरोना बद्दलच्या संदेशावर नियंत्रण नसल्याने अनेकदा अफवांचे पेव उठून उलटसुलट चर्चांना उधाण आल्याच्या घटना घडल्या आहेत.इतर व्हाट्सअप ग्रुप वरून आलेले संदेश खातरजमा न करता पुढे पाठवण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याने अनेकदा वादाचे प्रसंग देखील निर्माण होत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलकडे व्हाट्सअप ग्रुप वरून प्रसारित होणार्‍या संदेशवर लक्ष देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

    अनेक ग्रुप अ‍ॅडमिनने आपल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल करीत इतर सदस्यांना असा संदेश पाठविण्यापासून रोखले आहे.पुढे जात काही अ‍ॅडमिन कडून थेट ग्रुप रिमुव्ह करण्यात येत आहेत.सध्याच्या काळात सोशल मीडिया व विशेष करून व्हाट्सअप वापरकर्त्यांना सबुरीचा सल्ला देण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आल्याने,आता प्रत्येक जण आपल्याला येणारे संदेशाची खातरजमा करूनच पुढे पाठवण्याची खबरदारी घेत आहेत.

    व्हाट्सअ‍ॅप ग्रुप वरून एखादा समाजविघातक संदेश किंवा अफवा पसरविणारा संदेश प्रसारित झाला तर,ग्रुप अ‍ॅडमीनला व्यक्तिगत जबाबदार धरण्याचा इशारा दिला गेला आहे.त्यामुळे अडमिनचे धाबे दणाणले आहेत.