कृषी उत्पन्न बाजार समिती बनली गोदाम; शेडवर व्यापाऱ्यांचा कब्जा आणि शेतकऱ्यांचा माल मात्र रस्त्यावर

कृषी उत्पन्न बाजार समिती शेडवर शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी आणतात. मात्र, व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या ओट्यावर अनेक दिवसांपासून कब्जा केला असून शेतकऱ्यांना माल ओट्यावर न टाकता तो खाली रस्त्यावर टाकावा लागत आहे.

    रिसोड (Resode).  कृषी उत्पन्न बाजार समिती शेडवर शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी आणतात. मात्र, व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या ओट्यावर अनेक दिवसांपासून कब्जा केला असून शेतकऱ्यांना माल ओट्यावर न टाकता तो खाली रस्त्यावर टाकावा लागत आहे. याकडे संबंधित अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दिसत आहे. परंतु शेतकऱ्यांची मात्र गैरसोय होत आहे.

    शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीकरिता कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. नैसर्गिक आपत्तीपासून शेतमाल संरक्षणासाठी यार्डची निर्मिती केली आहे. स्पर्धात्मक पद्धतीने मालाची खरेदी खरेदीदाराकडून केली जाते. भौतिक सुविधा तसेच त्यांचे कमिशन शेतकऱ्यांकडून न घेता खरेदीद्वारे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजची परिस्थिती मात्र, कास्तकार विरोधी दिसून येत असून व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या शेडमध्ये कब्जा केला असल्याचे चित्र आहे.

    शेतकऱ्यांना रस्त्याच्या कडेला माल ठेवण्याची वेळ आली आहे. नियमांप्रमाणे खरेदी केलेला माल व्यापाऱ्यांनी ठराविक वेळेत उचलणे गरजेचे आहे. मात्र, रिसोड बाजार समितीच्या यार्डात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल अनेक दिवस उचलल्या जात नसून व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे यार्डाचे गोडावून केलेले आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यातून तातडीने मार्ग काढण्याची मागणी होत आहे.