विवाहाच्या नावावर होणा-या फसवणुकीपासून सावध राहा; दगाबाज विवाह जुळणी संस्थांचा सुळसुळाट

अलीकडे विवाह जुळविण्यात निर्माण होणा-या अडचणी पाहता या गोष्टी हेरून ऑनलाइन फसवणुकीच्या फंड्याप्रमाणे विवाह संस्थेच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत.

    वाशिम (Washim).  अलीकडे विवाह जुळविण्यात निर्माण होणा-या अडचणी पाहता या गोष्टी हेरून ऑनलाइन फसवणुकीच्या फंड्याप्रमाणे विवाह संस्थेच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत. विवाह उत्सुकांनी यापासून वेळीच सावध राहावे.असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गजानन खंदारे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

    अलीकडे विवाह जुळत नाहीत. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पूर्वी मुलामुलीत विवाह जुळायचे. आता अपेक्षा,प्रोफेशन व शिक्षण जुळत नसल्याने विवाह जुळण्यात विलंब होत आहे. त्यातच गरीब कुटुंबात विवाह जुळवण्यात अडचणी निर्माण होत आहे. नेमक्या याच बाबी हेरून फसवणूक करणा-यांचे मोठे रॅकेट कार्यान्वित झाले आहे. विवाह संस्थेची नोंदणी करून हे रॅकेट सेवा शुल्काच्या नावाखाली किंवा वेगवेगळ्या सोशल ग्रुपवरून प्रसारीत होणा-या बायोडाटा वरील नंबरवर फोन करून फसवणूक करत असल्याबाबत अनेक तक्रारी पुढे येत आहेत.

    फसवणूक झाल्यानंतर याबाबत पोलिसही तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे हे प्रकार वाढत आहेत. विवाह जुळवून देतो,परंतु त्याआधी अमुक रक्कम भरा.असा फोन आल्यास कोणीही पैसे भरू नये,अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.असे कळकळीचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा लग्न अक्षदाचे संस्थापक गजानन खंदारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.