तीन ऑक्सिजन प्रकल्पांची होणार उभारणी; पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन

वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालय येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 1 मे रोजी करण्यात आले.

    वाशिम (Washim).  जिल्हा स्त्री रुग्णालय येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 1 मे रोजी करण्यात आले. तसेच याठिकाणी आणखी दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पांच्या कामाचे भूमिपूजनही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

    यावेळी आ.अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर,जिल्हा कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात केंद्र शासनामार्फत प्राप्त निधीतून दर मिनिटाला हवेतून 200 लीटर ऑक्सिजन निर्मिती करणा-या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

    तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून याठिकाणी आणखी 2 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामधून प्रत्येकी 600 लीटर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून स्त्री रुग्णालय परिसरातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीचे काम 15 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री देसाई यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.