कोरोनाचा वाढता आलेख, प्रतिबंधक उपाय योजनाबाबत प्रशासनाची उदासीनता

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. तरीही नागरिक मात्र बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात कोरोना प्रतिबंध उपाय योजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.

    वाशीम (Washim).  मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. तरीही नागरिक मात्र बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात कोरोना प्रतिबंध उपाय योजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. आठवड्यातून एक दिवस मास्कसाठी मोहीम राबविली जात आहे. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    शहरी व ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक उपाय योजनाबाबत उदासीनता दिसून येत आहे. केवळ व्यापाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आरोग्य विभाग व्यस्त आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी, नागरिक मात्र याबाबत बिनधास्त आहेत. सध्या शहरात व्यापाऱ्यांची चाचणी करण्यात येत असून कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांना तातडीने कोविड सेंटरमध्ये किंवा घरीच विलगीकरणात ठेवून योग्य औषधोपचार व मार्गदर्शन करण्याचे गरजेचे असताना अशा रुग्णांना कुठेही प्रतिबंध व मार्गदर्शन औषधोपचार केल्या जात नाही.

    प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे पॉझिटिव आल्यानंतरही रुग्णांना आपण पॉझिटिव्ह असल्याचे माहिती होण्यास वेळ लागत आहे. हे पॉझिटिव्ह रुग्ण इतरांच्या संपर्कात तसेच आपल्या दैनंदिन कामात व्यस्त राहत आहेत. कित्येक जण पॉझिटिव्ह असूनही बिनधास्त वावरताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. वाढती रुग्ण संख्या प्रशासनासाठी मात्र ही चिंतेची बाब ठरत आहे.