वाशीम जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध कायम; आदेशाला २२ मार्चपर्यंत मुदतवाढ

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाला 22 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत.

    वाशीम (Washim).  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाला 22 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी जारी केले आहेत.

    संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना रविवारसह सातही दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू राहतील. रोज रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या काळात रुग्णालये, रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, रेल्वे स्थानक व बसस्थानक तसेच खासगी बसने उतरणाऱ्या प्रवाशांसाठी ऑटोरिक्षा, हायवेवरील पेट्रोलपंप, धाबे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग सुरू ठेवता येणार आहेत. या उद्योगाचे कर्मचारी, कामगार यांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे जाण्या-येण्याकरिता परवानगी राहणार आहे.

    घरपोच दूध वितरण, रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थांच्या घरपोच वितरणास सकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत तसेच सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागातील आठवडी बाजार व गुरांचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. ग्राहकांनी खरेदीसाठी जवळच्या बाजारपेठेचा वापर करावा. ठोक भाजी मंडई पहाटे 3 ते 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. मंडईमध्ये किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश राहणार आहे. जिल्ह्यातील उपहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास मुभा राहील. धार्मिक स्थळांत 10 व्यक्तींना प्रवेश राहील.

    लग्नासाठी वधू-वरासह 25 व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी यांची, तसेच ग्रामीण भागाकरिता तहसीलदार यांची पूर्वपरवानगी बंधनकारक राहील. नियम मोडल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉनचे चालक, मालक, व्यवस्थापक यांना 20 हजार किंवा प्रति व्यक्ती 500 रुपये यापैकी जी जास्त असेल तो दंड आकारला जाईल. दुसऱ्यांदा असे आढळल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन 15 दिवसांसाठी सील केले जाईल. लग्न समारंभ अथवा कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी गर्दी होणारी मिरवणूक काढता येणार नाही.

    आयोजकांनी लग्नस्थळी किती लोक उपस्थित राहणार आहेत, याची माहिती संबंधित पोलिस स्टेशनला कळविणे बंधनकारक राहणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद राहतील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (विद्यापीठ, शाळा, महाविद्यालये) येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणी, निकाल घोषित करणे इत्यादी कामाकरिता परवानगी अनुज्ञेय राहणार आहे. शहरी व ग्रामीण भागातील सर्व प्रकारची सिनेमागृह, मल्टिफ्लेक्स, व्यायामशाळा (जिम), स्पोर्ट कॉम्प्लेक्समधील इनडोअर, आऊटडोअर गेम्स, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील. संचारबंदी कालावधीत होणार्या पूर्वनियोजित परीक्षा ह्या त्यांच्या वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. परीक्षार्थींना सदर कालावधीत परीक्षेचे ओळखपत्र (हॉल तिकीट) व पालकांनी त्यांचे ओळखपत्र जवळ ठेवणे बंधनकारक आहे.

    मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालका व्यतिरिक्त इतर तीन प्रवासी अनुज्ञेय राहतील. ऑटोरिक्षा वाहनात चालक व्यतिरिक्त दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतर जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासीसह सामाजिक अंतर व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीला परवानगी राहील. याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक याबाबत नियोजन करतील.

    नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील जे उद्योग सुरू ठेवण्यास यापूर्वी परवानगी देण्यात आली आहे, ते सर्व उद्योग सुरू ठेवण्यासाठी परवानगी राहील. कर्मचारी, कामगारांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे ये-जा करण्याची परवानगी राहील. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये ही 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू ठेवता येणार आहेत. असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.