कापूस लागवडीवर बंधने आणू नका : आ. फुंडकर; हंगामपूर्व नियोजनासाठी पार पडली बैठक

कापूस लागवडीवर बंधने आणू नका, या महत्त्वाच्या विषयाकडे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी लक्ष वेधले. कृषी विभागाची बैठक पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षेतखाली 03 मे रोजी खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक झाली. बैठकीत त्यांनी हा विषय मांडला.

    खामगाव (Khamgaon).  कापूस लागवडीवर बंधने आणू नका, या महत्त्वाच्या विषयाकडे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी लक्ष वेधले. कृषी विभागाची बैठक पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षेतखाली 03 मे रोजी खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक झाली. बैठकीत त्यांनी हा विषय मांडला.

    आमदार फुंडकर म्हणाले, कृषी विभागाने कापूस लागवडीवर काही बंधने घातल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईक यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले. तसेच, बंधने आणू नये अशी मागणी केली. कापूस लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांनी जूनपूर्वी कापूस लागवड करू नये, असे निर्देश दिल्याचे एसएओंनी सांगितले. यावर आ. फुंडकर यांनी शेतकऱ्यांवर कृषी विभाग बंधने का आणते? शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कापूस पेरणी करू द्यावी. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार जूनमध्ये कापूस पेरणी केल्यास त्यावर बोंडअळी येते. परंतु जूननंतर पेरणी केल्यास बोंडअळी येणार नाही याची शाश्वती कृषी विभाग देणार का? यावर जिल्हा अधीक्षक उत्तर देऊ शकले नाहीत.

    यावर्षी सोयाबीनच्या बियाण्यांच्या तुटवड्याची शक्यता आहे. शेतकऱ्याकडे घरचे बियाणे नाही. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन हातचे गेले. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊन सोयाबीन बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत आढावा घेऊन सर्व तालुक्यांना सोयाबीन बियाण्यांचा साठा नियमित करून द्यावा. महाबीज बियाण्यांचा पुरवठा मुबलक प्रमाणात करण्यात यावा.

    बोगस बियाणे आढळल्यास कृषी विभाग कृषी केंद्रावर कारवाई करतो. वास्तविक ज्या कंपन्यांचे बियाणे बोगस निघते त्या कंपन्यांवर कारवाई अपेक्षित आहे. त्यामुळे बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपन्यांवरच कारवाई करण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांनी कृषिपंपासाठी अर्ज केले त्यांना अंदाजपत्रक देण्यात येऊन त्यांच्याकडून रकमेचा भरणा करून त्यांना कृषी पंप कनेक्शन देण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी आ. आकाश फुंडकर यांनी बैठकीत केली.