दीर्घकाळ अभ्यासापासून दूर राहिल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

कोरोनाकाळात ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाच्या नादात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पार बोजवारा उडाला आहे. मागील वर्षांपासून अनेक मुलांनी हातात वही, पुस्तक पेन्सिल, पेन न घेतल्याने आजच्या स्पर्धेच्या युगात अशा विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

  शिरपूर जैन (Shirpur Jain).  कोरोनाकाळात ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाच्या नादात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पार बोजवारा उडाला आहे. मागील वर्षांपासून अनेक मुलांनी हातात वही, पुस्तक पेन्सिल, पेन न घेतल्याने आजच्या स्पर्धेच्या युगात अशा विद्यार्थ्यांचे भवितव्य काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या मार्चपासून शाळा बंद आहेत. याचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर पालकांच्या प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना बसला आहे. हे विद्यार्थी मुख्य प्रवाहाच्या फार मागे पडले आहेत. गेल्या वर्षांपासून बहुतांश ग्रामीण विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक, वही नाही. मुले खेळण्यात आणि उनाडक्या करण्यात वेळ घालत आहेत. शाळेत मुले बांधील राहत होती. त्यांना शिक्षणाबाबत शिक्षकांचा धाक असल्याने अभ्यासही करायचे; परंतु आता शाळा नाही आणि अभ्यासाचे टेन्शन नाही. यामुळे पहिली ते चौथ्या वर्गापर्यंतची मुले अभ्यासापासून दूर गेले आहेत.

  ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल रिचार्ज, नेटवर्क या साऱ्या गोष्टींचा या वर्गाला मुख्य अडसर आहे. शेतकरी, शेतमजूर कामावर जातात, मुले शाळेत जात असल्याने त्यांना चिंता राहायची नाही. दरम्यान गेल्या वर्षापासून शाळाच नसल्याने घरी राहणाऱ्या मुलाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ देखील मिळत नाही. मुलं सांभाळणार की, पोटापाण्याची सोय लावणार? अशी परिस्थिती त्यांच्यासमोर निर्माण झाली आहे.

  दिर्घकाळ अभ्यासापासून दूर राहिल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाचे प्रयोग केले गेले. मात्र, ग्रामीण भागातून याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद तर, कसाच मिळाला नाही. सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीची मोठी चर्चा झाली. शिकण्यासाठी या पर्यायाची मदत होत असल्याचे सर्वच मान्य करतील असे समजल्या गेले. परंतु प्रत्येक शिकवण्याला हा पर्याय ठरू शकलेला नाही. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकाकडे मोबाईल उपलब्ध नाही. शिक्षणाच्या बाबतीत सजग असणाऱ्या शहरी पालकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षणाच्या जोडीला आपल्या मुलाकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांचा अभ्यास करून घेतला.

  ग्रामीण भागातील मुले अभ्यासात मागे
  ग्रामीण भागातील अल्पशिक्षित, अशिक्षित पालकांच्या मुलांची गेल्या वर्षभरापासून पुस्तक, वही, पेन्सिल, पेन, दप्तर यांच्याशी गाठच पडली नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत खूप मागे राहिला आहे. शहरी विद्यार्थी पुढे जात आहे, तर अर्थिक स्थितीमुळे व सुविधेअभावी ग्रामीण विद्यार्थी मागेच राहत असल्याने त्याचे भवितव्य अंधारात असल्याचे दिसून येत आहे.