गौणखनिजांचे उत्खनन सुरूच; महसूल, पोलिस विभागाकडून कारवाईची प्रतीक्षा

जिल्ह्यात सध्या विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी लागणाऱ्या गौणखनिजाची मागणी वाढल्याने काही गौणखनिज माफियांनी नवीन शक्कल लढविली आहे. जमीन खोदकामासाठी घ्यायची आणि मनात येईल त्याप्रमाणे नियम पायदळी तुडवीत परवानगीपेक्षा अधिक खोदकाम करायचे.

    गणेश भालेराव
    वाशिम (Washim).  जिल्ह्यात सध्या विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी लागणाऱ्या गौणखनिजाची मागणी वाढल्याने काही गौणखनिज माफियांनी नवीन शक्कल लढविली आहे. जमीन खोदकामासाठी घ्यायची आणि मनात येईल त्याप्रमाणे नियम पायदळी तुडवीत परवानगीपेक्षा अधिक खोदकाम करायचे. त्यामुळे अवैध गौणखनिज उत्खननाचा गोरखधंदा पुन्हा फोफावत आहे.

    या गंभीर बाबीकडे त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. लॉकडाऊन काळात बांधकामासाठी लागणारे गौणखनिज मनमानी भावाने विकले जात असल्याचे समोर येत आहे. मात्र या गौणखनिज माफियांना कुणाचे पाठबळ आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. वाशीम तालुक्यातील बोराळा, तोंडगाव, रिसोड तालुक्यातही अनेक ठिकाणी ई क्लास जमिनीतून अवैध मार्गाने उत्खनन सुरू आहे. हा प्रकार महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत नसावा याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    आता जिल्ह्याबाहेरून रेती येत आहे. त्याची रॉयल्टी भरली की नाही याची महसूल विभागाने चौकशी केली पाहिजे. मात्र त्याबाबत संबंधित अधिकारी कर्मचारी डोळे झाक करीत असल्याचा आरोप आहे. नेहमीच्या भावापेक्षा वाढीव दराने रेती नागरिकांच्या माथी मारण्यात येत आहे.

    गिट्टी, मुरूम, क्रश आणि रेतीची वाहन क्षमतेपेक्षा सहा सात ब्रास ओव्हर लोड वाहतूक सुरू आहे. मात्र आरटीओ व पोलिस डोळेझाक करीत आहेत. त्यामुळेच पुन्हा शहरातून जड वाहतूक सुरू झाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक जड वाहतूक करण्यात येत आहे. अनेक जण क्षमतेपेक्षा जास्त रेती, गौणखनिज आणतात व खाली उतरवून वाढीव भावाने विकतात. विटा सुद्धा क्षमतेपेक्षा अधिक आणल्या जात आहेत. तरी सुद्धा कारवाई का होत नाही हाच तर खरा प्रश्न आहे.

    लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय?
    अधिकारी जर आपले कर्तव्य नीट पार पाडत नसतील तर अशा वेळी लोकप्रतिनिधींनी त्यांचे कान टोचण्याची गरज आहे. पोलिस व महसूल विभागाच्या डोळ्यादेखत गौण खनिजाची राजरोस अवैध वाहतूक सुरू आहे. त्यानंतरही प्रशासनाला जाग येत नाही. याप्रकरणी लोकप्रतिनीधींनी कारवाई करावी अशी जनसामान्यांना अपेक्षा आहे.

    जिल्ह्यात सध्या विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी लागणाऱ्या गौणखनिजाची मागणी वाढल्याने काही गौणखनिज माफियांनी नवीन शक्कल लढविली आहे. जमीन खोदकामासाठी घ्यायची आणि मनात येईल त्याप्रमाणे नियम पायदळी तुडवीत परवानगीपेक्षा अधिक खोदकाम करायचे.