पाच किलोमीटर परिसर प्रतिबंधित; पोहरादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी

बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून ख्यात श्री क्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथील यात्रा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ता 18 एप्रिलपासून 22 एप्रिलपर्यंत पाच किलोमीटर परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

    मानोरा (Manora).  बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून ख्यात श्री क्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथील यात्रा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ता 18 एप्रिलपासून 22 एप्रिलपर्यंत पाच किलोमीटर परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. पोहरादेवी व उमरी खुर्द येथे येणाऱ्या भाविकांसाठी सर्व मार्गावर बॅरिकेटस लावून नाकाबंदी केली आहे.

    रामनवमी निमित्त श्री क्षेत्र पोहरादेवी येथे मोठी यात्रा भरते. यावेळी बंजारा बांधव देशाच्या कानाकोपऱ्यातून जगद्गुरू संत सेवालाल महाराज, जगदंबा देवी, राष्ट्रसंत डॉ. रामराव महाराज व दानशूर बाबनलाल महाराज यांच्या चरणी माथा टेकण्यासाठी लाखोंच्या संख्येत येतात. देशात कोरोना महामारीचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या वर्षी यात्रा रद्द करण्यात आली. भाविक दर्शनासाठी येऊ नये म्हणून पोहरादेवी परिसरातील पाच किमी परिसर मानवी हालचालींना पूर्णतः प्रतिबंध करण्यात आला आहे.

    पुसद मार्गे गहुली फुलउमरी कडे येणाऱ्या सोमेश्वरनगर, फुलउमरी, सिंगदमार्गे उमरीकडे येणारा रस्ता, सिंगदमार्गे आमकिनहीकडे येणारा रस्ता, मानोरामार्गे पांचाळा फाटा, दिग्रसमार्गे वाईगौळ रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्यात आले आहेत. प्रत्येक बॅरिकेटसवर एक अधिकारी, दोन जमादार, तीन कर्मचारी, एक महिला पोलिस असे पथक तयार करून कडक नाकाबंदी ता 18 ला सायंकाळपासून केली आहे. नाकाबंदी दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पाच पथक तयार करण्यात आले आहे.