पुसद येथील बनावट दारूची फुलउमरीत विक्री; गावातील युवक झाले व्यसनाधीन

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील बनावट दारूची तालुक्यातील फुलउमरी येथे एका गावात आठ ते दहा ठिकाणी अवैध दारू विक्री होत असून याकडे संबंधित विभागाचे मात्र, दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

    मानोरा (Manora).  यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील बनावट दारूची तालुक्यातील फुलउमरी येथे एका गावात आठ ते दहा ठिकाणी अवैध दारू विक्री होत असून याकडे संबंधित विभागाचे मात्र, दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

    त्यामुळे बियर, विदेशी दारू तसेच विविध ब्रँडची देशी दारू मोठ्या प्रमाणात सहज उपलब्ध होत असल्याने तरुण युवक याच्या व्यवसनाच्या आहारी जात आहेत.परिणामी अनेकांना किडनी आजाराच्या विळख्याने येथील युवकांना अकाली निधन ओढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    वरिष्ठनी याकडे लक्ष देऊन येथील अवैध व्यवसायवर अंकुश लावावा,अशी मागणी महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने केली जात आहे. मानोरा पोलिस स्टेशन अंतर्गत पोहरादेवी पोलिस चौकी व मंगरुळपीर दारू उत्पादन शुल्क विभागाच्या अंतर्गत फुलउमरी या गावचे क्षेत्र येते. या गावाची लोक संख्या आठ हजाराच्या आसपास असून या गावापासून पुसदचे अंतर सत्तावीस किलोमीटर एवढेच आहे.पुसदची बनावट दारू स्वस्त व लवकर उपलब्ध होत असल्याने तसेच बनावट दारूमुळे झिंगण्यासही लवकर सुरवात होत असल्यामुळे येथील व्यावसायिक ग्राहकांना माफक दरात पाहिजे ती पुसद मेडची विविध ब्रँडची दारू उपलब्ध करून देत आहेत.त्यामुळे तरुण पिढी दारूच्या आहारी मोठ्या प्रमाणात जात आहे.

    बनावट मद्य प्राशनामुळे अनेक युवकांच्या किडनी निकामी होऊन अनेकांनी मृत्युला कवटाळले आहे.तर,काही युवकांच्या तारूण्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.नशेची लत लागल्याने व गावात सहज अवैध दारू व बियर मिळत असल्याने गावामध्ये तंट्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असे असताना सामान्य जनतेचे व पदाधिकारी यांचा संपर्क नंबर संबंधित यंत्रणेकडे नसेल मात्र,अवैध धंदे करणार्‍यांचे संपर्क नंबर या व्यवसायांना पाठिशी घालणार्‍यांकडे सहज उपलब्ध आहेत.

    हप्ता आला नाही की न चूकता संपर्क करून तो वसूल केला जातो. त्यामुळे एकेकाळी एक दोन ठिकाणी चोरून मिळणारी दारू आता हप्ता संस्कृतीमुळेच मोठ्या प्रमाणात फोफावली आहे.अवैध दारू विक्रेत्यांना मनमानी करण्याचे आणि कोठेही दारू विक्री करण्याची परवानगी दिली काय अशी स्थिती गावात निर्माण झाली आहे.राजरोस पणे गावात आठ ते दहा ठिकाणी अवैध दारूची विक्री खुलेआम करण्यात येत आहे.