प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाशीम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदिवासी बांधवांकरिता कायदे व योजना’ याविषयीचे मार्गदर्शन शिबिर काळाकामठा येथे करण्यात आले होते.

    वाशीम (Washim).  अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वाशीम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदिवासी बांधवांकरिता कायदे व योजना’ याविषयीचे मार्गदर्शन शिबिर काळाकामठा (ता. मालेगाव) येथील सुशीलाबाई देशमुख प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत आयोजित करण्यात आले होते.

    यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी आदिवासी बांधवांसाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणद्वारा राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ लिपिक एस. एन. जगताप यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारा राबविण्यात येणार्या योजनांची माहिती दिली. माजी जिल्हापरिषद सदस्य आत्माराम धंदरे यांनी आदिवासी बांधवांसाठी योजना राबविण्यात येत असताना उपस्थित होणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन केले.

    मुख्याध्यापक कळसकर यांनी आदिवासी बांधवांसाठी घटनात्मक तरतुदी व योजना या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थिताना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती असलेले परिपत्रके व कोविड-19 च्या अनुषंगाने मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक अंतर व इतर कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.