वसतिगृह कर्मचारी सहा महिन्यापासून वेतनाच्या प्रतिक्षेत; पालकमंत्र्यांना निवेदनाव्दारे मागणी

मंगरुळपीर येथील शासकीय वसतीगृहावर कार्यरत विविध कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून वेतन देण्यात आले नसल्याने त्यांना विविध आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रखडलेले वेतन तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    वाशिम (Washim).  मंगरुळपीर येथील शासकीय वसतिगृहावर कार्यरत विविध कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून वेतन देण्यात आले नसल्याने त्यांना विविध आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रखडलेले वेतन तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    मंगरुळपीर येथील सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत संचालित शासकीय निवासी शाळा व मुलामुलींच्या वसतीगृहामध्ये ब्रिक्स इंडीया प्रा. ली.पुणे व बिव्हीजी इंडिया प्रा. ली. पुणे मार्फत 1 एप्रिल 2019 पासून कार्यरत सफाई कामगार,माळी व सुरक्षा रक्षकांना गेल्या सहा महिन्यापासून वेतन मिळाले नसल्यामुळे त्यांची उपासमार सुरु आहे. कोरोना महामारीमध्ये या वसतीगृहाचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर झाल्यानंतर हे बाह्यस्त्रोत कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत व यातील काही जणांना कोरोनाची लागण सुध्दा झाली आहे. कर्मचाऱ्यांना त्वरित प्रलंबित वेतन देऊन त्यांची उपासमार थांबविण्याच्या मागणीचे निवेदन 1 मे रोजी पालकमंत्र्यांना देण्यात आले.

    उपचार झाल्यानंतर हे कर्मचारी पुन्हा कामावर रुजु झाले आहेत. आपले कर्तव्य चोखपणे बजावत असताना ह्या कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यापासून वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांची मोठी उपासमार होत आहे. तसेच बाहेरगावावरुन येणाऱ्या कर्मचाऱ्यांजवळ पेट्रोल व भाड्यासाठी सुध्दा पैसे नाहीत. उसने पैसे घेतल्यानंतर पैशासाठी देण्यासाठी तगादा लावला जात आहे. वेतन मिळण्यासाठी संंबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार विचारले असताना त्यांच्याकडून केवळ आश्वासनच मिळत आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची होणारी उपासमार लक्षात घेऊन त्यांना प्रलंबित व नियमित वेतन मिळण्यासह जिवित हानी झाल्यावर त्यांना विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी या कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.