नव्या पालवीने सृष्टीला हुरूप; विविधरंगी फुलांची उधळण

प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग नियमानुसार बदल अटळ आहे. ऋतुचे सोहळे साजरे करताना नवचैतन्याची झळाळी मिळते. ग्रीष्माच्या तडाख्याने ओसाड झालेल्या वनराईत, आता विविध रंगी फुलांची होत असलेली उधळण कोरड्या झालेल्या मनाला ओलावा देत प्रसन्न करत आहे.

    शिरपूर जैन (Shirpur Jain).  प्रत्येक ऋतूमध्ये निसर्ग नियमानुसार बदल अटळ आहे. ऋतुचे सोहळे साजरे करताना नवचैतन्याची झळाळी मिळते. ग्रीष्माच्या तडाख्याने ओसाड झालेल्या वनराईत, आता विविध रंगी फुलांची होत असलेली उधळण कोरड्या झालेल्या मनाला ओलावा देत प्रसन्न करत आहे. शिशिरात निसर्ग बैरागी बनतो. त्या पाठोपाठ वसंत आणि चैत्रात निष्पर्ण झाडांना नव्या पालविणे हुरूप येतो.

    निसर्ग हा काळानुरूप स्वतःला नवनवीन रूप बहाल करीत असतो. या बदलत्या चक्रात तीन ऋतुचे सोहळे साजरे केले जातात. पूर्वापार काळापासून चालत आलेली ही निसर्गातील परंपरा आजही तशीच कायम टिकून आहे. उन्हाळा हा ऋतू अंगाची लाहीलाही करणारा असून आपल्या प्रखर किरणांनी आग ओकत अस्तित्वाची जाणीव करून देत असतो. उष्णतेने सारे रान अक्षरशः करपून जात मग वनराई ओसाड रूप धारण करू लागते. शिशिरात जंगलातील झाडांची पानगळ सुरू होते.

    त्यामुळे अधिकच भकासपण जाणवते. निसर्गातील त्यागी वृत्तीने हिरवीगार झाडे पर्णहीन होतात. मग हळूच आपल्या चोरपावलांनी वसंताची चाहूल लागते. हा ऋतू सा-या ऋतू चा राजा म्हणून ओळखला जात असल्याने वसंताला ऋतुराज असे संबोधले जाते. कोकिळेच्या मंजुळ सुरांनी आसमंत मंत्रमुग्ध होऊन त्या पाठोपाठ लगेच चैत्राचे आगमन होते. चैत्रात पर्णहीन झालेल्या फांद्यांना नवी पालवी फुटू लागते. पाना फुलांनी पुन्हा वृक्ष बहरून येतात.

    निसर्गातील चमत्कारी बदलाने निसर्गाला हुरूप येतो. चाफा,गुलमोहर,पळस आदी उन्हाच्या तडाख्यातही विविधरंगी फुलांची उधळण करीत मनाला गारवा मिळवून देतात. ओसाड झालेला निसर्ग काहीसा बहरून येतो. तेव्हा बळीराजाला पावसाचे वेध लागतात. मागील वर्षीप्रमाणे यंदाही हवामान विभागाने चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे भाकीत केल्याने शेतकरी सुद्धा सुखावलेला दिसत आहे.