गौण खनिज उत्खननाची चौकशी करा; डॉ. क्षीरसागर यांच्यासह नागरिकांची मागणी

अकोला ते नांदेड महामार्गाच्या कामाकरिता मॉर्टो कार्लो प्रा. लि. कंपनीच्या वतीने मालेगाव तालुक्यातील खिर्डा व चिवरा येथून हजारो ब्रास गौण खनिजाचा उपसा करण्यात आला आहे.

    वाशीम (Washim).  अकोला ते नांदेड महामार्गाच्या कामाकरिता मॉर्टो कार्लो प्रा. लि. कंपनीच्या वतीने मालेगाव तालुक्यातील खिर्डा व चिवरा येथून हजारो ब्रास गौण खनिजाचा उपसा करण्यात आला आहे. सदर गौण खनिज उत्खननाची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करावी, अशी मागणी कृषी क्रांती मंच व काशीनाळ बाबा भक्त मंडळ तसेच चिवरा येथील नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    मात्र, एक महिन्याचा कालावधी होऊनही या कामासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. येथील वाहनांनी अनेक रस्त्यांची वाट लावली आहे. त्यामुळे सदर गौण खनिज उत्खननाची चौकशी करून महसूल बुडविणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, मॉटो कार्लो कंपनीच्या वतीने अकोला नांदेड महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजाचे उत्खनन करून खिर्डा, डव्हा येथील शेतशिवारातील पर्यावरणा नियमाच्या विरुद्ध या शिवारातील असलेल्या टेकड्यांचे खोदकाम केले आहे. या खोदकामामुळे पर्यावरणाचे नुकसान होऊन या शिवारातील शेतकरी लोकांच्या कृषक जमिनीला बाधा निर्माण झाली आहे. तसेच खासगी शेतजमिनीतून सुद्धा गौण खनिजाची उचल करून कृषक शेतजमिनीचे नुकसान केले आहे. तसेच मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील शासकीय जमिनीवरील गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले आहे. या ठिकाणी शेततळे निर्माण करण्याचे ठरले असतानाही सदर शेततळे अर्धवट सोडून आता दुसऱ्या ठिकाणाहून चिवरा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शासकीय जमिनीवरून गौण खनिजाचे दरदिवशी हजारो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करण्यात येत आहे.

    सदर शेततळे पूर्ण करण्याच्या कालावधीला जवळपास एक वर्ष होत असतानाही अद्याप हे शेततळे कंपनीच्या वतीने पूर्ण करून देण्यात आले नाही. तर केवळ पाणी साठा होण्याच्या नावावर हजारो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केल्या जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी वापर होत असलेल्या वाहनाने अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना या नियमबाह्य कामाबाबत विचारणा केली असता कंपनीच्या वतीने कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या प्रकरणाची चौकशी न केल्यास तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही डॉ. राधाकिसन क्षीरसागर यांनी दिला आहे. निवेदनावर चिवरा व खिर्डा येथील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रतिलिपी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय कृषिमंत्री यांच्या कार्यालयात पाठविण्यात आल्या आहेत.